Shivsena MLA Sachin Ahir: शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंची साथ दिलेल्या सचिन अहिर यांना विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची लॉटरी लागली आहे. आज विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून सचिन अहिर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज भरला होता, मात्र त्यांनी अर्ज माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
विधानपरिषदेत निवडणुकीला सुरुवात होताच ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ज मो अभ्यंकर यांचा अर्ज आला आहे मात्र आत्तापर्यंतच्या परंपरेनुसार बिनविरोध निवडणूक व्हावी असं ते म्हणाले. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीही तात्काळ संमती दिली ज्यानंतर ज मो अभ्यंकर यांचा अर्ज मागे घेण्यात आला आणि सचिन अहिर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन..!
सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. "सचिन अहिर हे चळवळीतून तयार झालेले नेतृत्व आहे. सलग तीन वेळा आमदारकीसह त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याचीही संधी मिळाली. मंत्री म्हणून प्रत्येक विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. समर्पक उत्तर देणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सचिन अहिर हे धनुष्यबाण चिन्हावरच निवडून आले आहेत, राजकारणात योग्यवेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो," अशी फटकेबाजी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
(नक्की वाचा : मुंबई, नवी मुंबईत जोरदार पाऊस! अंधेरी सब वे पाण्याखाली; वाहतुकीचा खोळंबा, कुठे काय स्थिती? वाचा..)