Mumbai News: 'ना शोक ना चिंता, PM मोदी अजब रसायन..,' 'सामना'तून टीकेचा बाण

सरकारच्या चेहऱ्यावर ना शोक ना चिंता. जणू काही घडलेच नाही अशा थाटात सरकारचे प्रमुख नेताजी वावरत आहेत. '' असे म्हणत पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधण्यात आला. 

जाहिरात
Read Time: 3 mins

मुंबई: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी  हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून या हल्ल्याचे चोख प्रत्यूत्तर दिले जाईल असा इशारा गृहमंत्री अमित शहांनी दिला आहे. दुसरीकडे या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी सध्या वेव्हज परिषदेसाठी मुंबई दौऱ्यावर आलेत. या दौऱ्यावरुन ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सामना अग्रलेख...

'पंतप्रधान मोदी हे एक अजब रसायन आहे. ही महान व्यक्ती कोणत्या मातीपासून बनली आहे हा संशोधनाचा विषय ठरावा. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी दिवसभर मुंबईतील सिने तारे-तारका वगैरे लोकांत होते. मनोरंजनाच्या दुनियेत त्यांनी भरपूर वेळ व्यतीत केला. शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान असे हिंदी सिनेसृष्टीतले लोक पहिल्या रांगेत बसून मोदी यांचे मनोरंजनाच्या दुनियेवरील भाषण ऐकत होते, अशी टीका या अग्रलेखामध्ये करण्यात आली आहे.

'कश्मीरात 26 निरपराध्यांची हत्या झाली आहे. देश अजूनही त्या दुःखातून सावरलेला नाही. ज्यांच्या घरातला माणूस मारला गेला, त्या घरात आजही हुंदके आणि अश्रूचे पाझरणे सुरू आहे. एकंदरीत देशावर दुःखाचे सावट आहे. परदेशातील एखादी प्रमुख व्यक्ती गेली तरी देशात दुखवटा पाळला जातो. भारतात कोणी आजी-माजी पुढारी ईहलोकी रवाना झाला तरी राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणून राष्ट्रीय शोक व्यक्त होतो व सर्व सरकारी, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना फाटा दिला जातो. इथे 26 भारतीय नागरिक निघृणपणे मारले गेले, पण सरकारच्या चेहऱ्यावर ना शोक ना चिंता. जणू काही घडलेच नाही अशा थाटात सरकारचे प्रमुख नेताजी वावरत आहेत. '' असे म्हणत पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधण्यात आला. 

(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)

"आपल्या पंतप्रधानांना मनोरंजनाच्या दुनियेत वावरायला आवडते, पण राष्ट्रावर हल्ला होतो तेव्हा राज्यकर्त्यांनी काही पथ्ये पाळायला हवीत. मुंबईतील मनोरंजन उद्योगातले मोदींचे भाषण पुढे ढकलता आले असते किंवा दृकश्राव्य माध्यमांतून त्यांना संदेश देता आला असता, पण झगमगत्या तारका मंडळात मोदी स्वतः अवतरले. त्यानिमित्ताने 26 निरपराध्यांच्या हत्येचे दुःख बाजूला ठेवून भाजप व त्यांच्या महाराष्ट्रातील सरकारने मुंबई सजवून लावले."

 "त्यामुळे मुंबईकरांनी दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे जे फलक लावले होते ते या झगमगाटी फलकमाऱ्यात झाकोळले गेले. मोदी यांनी सिने तारे-तारकांपुढे जे भाषण केले त्यात त्यांनी सांगितले, "मानवाला रोबो बनवायचे नाही, तर संवेदनशील बनवायचे आहे." पंतप्रधानांचा विचार चांगला आहे, पण ते किती संवेदनशील आहेत? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 2019 मध्ये 40 जवानांची हत्या पुलवामात झाल्यावरही ती संवेदनशीलता दिसली नव्हती आणि आता पहलगाममध्ये 26 नागरिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले तेव्हाही त्यांच्यासाठी संवेदनशीलता दिसली नाही,"

(नक्की वाचा- Jalgaon Politics : जळगावात शरद पवारांना मोठा धक्का; दोन शिलेदार अजित पवारांसोबत जाणार)

 "अनेक कारणांनी पंतप्रधान मोदी हे मंचावर कॅमेऱ्यासमोर रडतात. अगदी हुकमी हुंदके देतात. त्यामुळे देश भावनिक होतो. पुलवामा आणि पहलगाम रक्तकांडानंतर पंतप्रधानांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या नाहीत. या हल्ल्यानंतर सगळ्यात आधी ते बिहारात प्रचारासाठी गेले व काल मुंबईतील मनोरंजनाच्या कार्यक्रमात पोहोचले. मुंबईत जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद सुरू आहे व त्या कार्यक्रमाच्या यशासाठी बऱ्याच दिवसांपासून सरकारने कष्ट घेतले. जगभरातून या क्षेत्रातील उद्योजक मुंबईत आले. त्यामुळे कार्यक्रम रद्द करणे शक्य नसावे, पण आपल्या घरात 26 निरपराध्यांची प्रेते पडली आहेत आणि त्यांच्या चितेवरील राखदेखील अजून धगधगते आहे. भारत जितका दुखात आहे तितकाच संतप्त आहे हे जगभरातून आलेल्या प्रतिनिधिंनी दाखवायला हवे होते," असं या अग्रलेखामध्ये म्हटले आहे.