विशाल पाटील, सिंधुदुर्ग: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यदिव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नारायण राणे, नितेश राणे तसेच शिंवेंद्रराजे भोसले या लोकार्पण सोहळ्यास हजर राहतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहेत नव्या पुतळ्याची वैशिष्ट्ये?
सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्ध समयी बाजात म्हणजेच योद्धा भूमिकेत (warrior pose) असलेल्या तलवारधारी 60 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. तलवारीसह पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी आहे. तसेच पुतळ्याच्या चबुतराची उंची 10 फूट इतकी आहे.
जमीन पातळीपासून या पुतळ्याची एकूण उंची 93 फुट इतकी आहे. पुतळा उभारण्यासाठी ब्राँझ धातूचा उपयोग करण्यात आला असुन यामध्ये 88% तांबे, 4% जस्त व 8% कथिल धातूचा समावेश आहे. पुतळ्यासाठी सरासरी 6 ते 8 मिलिमीटर जाडीचे कांस्य वापरण्यात आले आहे. या कामासाठी DUPLEX स्टेनलेस स्टीलचे सपोर्ट फ्रेमवर्क, स्टेनलेस स्टील SS ३१६ दर्जाचे सळई असे गंजरोधक बांधकाम साहित्य वापरण्यात आले आहे.
नक्की वाचा - भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story
चबुतरासाठी उच्च दर्जाचे काँक्रीट तसेच स्टेनलेस सळई वापरण्यात आले आहे. फियान, निसर्ग, तोक्ते यासारखी वादळे गेल्या काही वर्षात अधिकाधिक तीव्रतेची वारंवार उद्भवत आहेत. त्यानुसार सदर पुतळा सर्व वातावरणीय परिणामांच्या माऱ्यास योग्य प्रकारे तोंड येईल, या पद्धतीने संरचनात्मक संकल्पना करून बांधण्यात आला आहे. पुतळ्याचे किमान आयुर्मान 100 वर्षे राहील अशा पद्धतीने ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांनी हे काम केले आहे. तसेच पुढील 10 वर्ष नियमित देखभाल व पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे.