संकेत कुलकर्णी
गाव तिथे एसटी हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रिद वाक्य आहे. आज ही गावा गावात जाण्यासाठी एसटी हेच पहिल्या पसंतीचे साधन आहे. लोक एसटीवरच विश्वास ठेवतात. शिवाय प्रवासासाठी त्यालाच प्राधान्य देतात. पण अनेकांनी या एसटीचे चांगले वाईट अनुभव आले आहेत. पण एसटीची विश्वासहर्ता काही कमी झालेली नाही. मात्र आज एक अशी घटना घडली त्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. करमाळा डेपोची एसटी धावत असतानाच बसची डिझेल टाकी खाली पडली. मात्र चालक आणि वाहकांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली.
करमाळा इथून विशिंबी इथं जाण्यासाठी ही बस निघाली होती. ती सिद्धार्थ नगर भागात पोहोचली. बसमध्ये प्रवाशी होते. त्याच वेळी एसटी बसची डिझेलची टाकी रस्त्यावर पडली. त्यावेळी मोठा आवाज झाला. टाकीसह गाडी पुढे धावत असल्याने जोरदार आवाज झाला. चालकाने गाडी तातडीने थांबवली. त्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवले. वाहकाने त्यासाठी त्यांना मदत केली. मोठा आवाज झाल्याने प्रवाशी ही घाबरले होते. नक्की काय झाले आहे हे त्यांना ही समजायला मार्ग नव्हता.
ज्यावेळी ते खाली उतरले तेव्हा त्यांना एसटीची डिझेल टाकीच खाली पडली असल्याचं दिसून आलं. चालक वाहनाने तातडीने करमाळा बस डेपोला संपर्क केला. झालेल्या अपघाताची हकीगत त्यांना सांगितली. त्यानंत डेपोचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ही टाकी नक्की कशी पडली हे चालकाच्या ही लक्षात आले नाही. गाडी खराह होती का? किंवा तिच्या देखभालीमध्ये काही कसूर राहीली होती का हा आता तपासाचा भाग निर्माण झाला आहे. पण यामुळे एक मोठी दुर्घटना घडली असती.
हा प्रकार म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचं बोललं जात आहे. जर भरलेली डिझेलची टाकी उष्णता आणि घर्षणामुळे फुटली असती तर केवढा मोठा अनर्थ झाला असता असं ही प्रवाशी बोलत आहे. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या अपघाताची आता चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर ती डिझेलची टाकी कशी पडली हे स्पष्ट होणार आहे. मात्र असे प्रकार पुन्हा होवू नयेत यासाठी एसटी महामंडळाने कडक पावलं उचलण्याची आवश्यकता आहे.