सौरभ वाघमारे, प्रतिनिधी
Solapur News: सोलापूरमधून अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेवर तातडीने निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून कोणताही पैसा काढण्यास किंवा बँकेला नवीन कर्ज देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हे संकट ओढवल्याने हजारो कुटुंबे अडचणीत आली आहेत. निर्बंधांची बातमी कळताच बुधवारी (८ ऑक्टोबर) सकाळपासूनच बँकेच्या मुख्य शाखेसमोर चिंताग्रस्त ठेवीदारांनी मोठी गर्दी केली आहे."
बँकेबाहेर ठेवीदारांची मोठी गर्दी
निर्बंधाची बातमी कळताच बुधवारी (8 ऑक्टोबर) सकाळपासूनच समर्थ सहकारी बँकेच्या मुख्य शाखेसमोर ठेवीदारांची मोठी गर्दी झाली होती. हातात पासबुक घेऊन आलेले लोक, चेहऱ्यावर चिंता आणि डोळ्यांत हताशपणा घेऊन बँक कर्मचाऱ्यांकडे चौकशी करत होते. मात्र, "सध्या कोणतीही ठेव काढता येणार नाही," हे एकच उत्तर बँक कर्मचाऱ्यांकडून मिळत असल्याने अनेकांचे डोळे पाणावले.
(नक्की वाचा : Gmail ते Zoho Mail : अमित शाहांप्रमाणे तुम्हालाही ई मेल स्विच करायचा आहे? फॉलो करा या सोप्या Step )
जीवनावश्यक गरजांसाठी पैसा नाही
अनेक ठेवीदारांनी आपली आर्थिक अडचण मांडताना भावूक झाले. एका ठेवीदाराने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे अडकल्याची व्यथा मांडली. काही जणांनी आजारी आईच्या उपचारांसाठी लागणारे पैसे त्वरित मिळण्याची मागणी केली.
यावेळी एका शेतकऱ्यानं 'NDTV मराठी' शी बोलताना सांगितले की, "मागील वर्षीच्या ऊसाचे पैसे नुकतेच बँकेत जमा झाले होते आणि आता तेच अडकले आहेत. आधीच पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे." या निराशाजनक परिस्थितीमुळे काही महिलांना बँकेसमोरच हंबरडा फोडला.
दिवाळी आणि सणाचे नियोजन थांबले
दिवाळी हा मोठा सण काही दिवसांवर आला आहे. त्यावरच हे संकट ओढवले आहे. मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, वैद्यकीय खर्चासाठीची सोय आणि सणाच्या तयारीसाठीचे सर्व नियोजन बँकेतील पैसे अडकल्यामुळे थांबले आहे. संसाराच्या दिव्यांवर पाणी ओतल्यासारखी ही स्थिती असल्याची भावना ठेवीदारांमध्ये आहे.
RBI चे निर्देश काय?
प्राथमिक माहितीनुसार, समर्थ सहकारी बँकेची आर्थिक स्थिती बळकट होईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. RBI च्या निर्देशानुसार, बँकेला ठेवीदारांना कोणताही पैसा काढण्यास किंवा नवीन कर्ज प्रस्तावांना मंजुरी देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.