Solapur to Mumbai Flight : डबल धमाका, मुंबईसह बंगळुरूही काही मिनिटात गाठता येणार; शेड्यूल, तिकीटदर किती?

तब्बल 16 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ झाला आहे. यानिमित्ताने सोलापूरकरांना डबल धमाका मिळाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Solapur to Mumbai Flight Service : तब्बल 16 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ झाला आहे. 15 ऑक्टोबरपासून सोलापूर-मुंबई विमानसेवेला सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानसेवेचा शुभारंभ झाला. विशेष म्हणजे सोलापूर ते बंगळुरू अशी विमानसेवाही सुरू करण्यात आली आहे. मुंबईहून निघालेलं विमान आधी सोलापूर आणि त्यानंतर बंगळुरूच्या दिशेने रवाना होणार आहे. आणि बंगळुरूहून निघालेलं विमान सोलापुरात थांबून पुढे मुंबईच्या दिशेने निघेल. 

मुंबई ते सोलापूर विमानसेवा कशी असेल?

मुंबई ते सोलापूर हे 476 किलोमीटरचं अंतर विमानाने अवघ्या 50 मिनिटात पार करता येणार आहे. यासाठी विमान तिकीटाची अंदाजे किंमत 4 हजार रुपयांच्या घरात आहे. सोलापूरहून मुंबईच्या दिशेने दुपारी 12:55 वाजता विमान सुटेल. तर मुंबईहून सोलापूरसाठी दुपारी 2:45 वाजता विमान सुटेल. मुंबईहून सोलापूरच्या दिशेने रेल्वेने प्रवास करायचा असल्यास साडे सहा तासांचा अवघी लागतो. तिकीटाबाबत सांगायचं झाल्यास स्लीपर 300 रुपये, 3AC - 800, 2A - 1000, 1A - 1,811 रुपयांपर्यंत आहे.

नक्की वाचा - Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून 13 जिल्ह्यांना अलर्ट

आठवड्यात किती दिवस विमानसेवा सुरू राहणार?

सोलापुरातून मुंबईसाठी आणि मुंबईतून सोलापूरसाठी प्रत्येक आठवड्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार विमानसेवा सुरू राहणार आहे. या दिवशी सोलापुरातून मुंबईसाठी दुपारी 12.55 वाजता तर मुंबईहून सोलापूरसाठी दुपारी 2.45 वाजता विमान उड्डाण घेणार आहे. तसेच या दिवशी बंगळुरूहून सोलापूरसाठी सकाळी 11.10 वाजता विमान झेपावणार असून सोलापुरातून बंगळुरूला जाणारे विमान दुपारी 4.15 वाजता सोलापुरातून उड्डाण घेणार आहे. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर - मुंबई आणि सोलापूर - बंगळूरु अशी नियमित विमानसेवा सुरू होत असल्यामुळे सोलापूरकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. बंगळुरू ते सोलापूरदरम्यान तिकीटदरही 5 हजारांच्या जवळपास असेल

विमानसेवेमुळे नागरिकांना अवघ्या 50 मिनिटात मुंबई गाठता येणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांसाठी अनेक करिअरची दारं खुली झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी सोलापूर ते गोवा अशी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. सोलापूर ते गोवा या 409 किलोमीटर अंतरासाठी विमान तिकीटाचा दर 3,500 ते 5,000 दरम्यान असल्याची माहिती आहे. गोव्यानंतर सोलापूरकर अवघ्या काही मिनिटात मुंबई गाठू शकतात.

Advertisement