सध्या महागाई मोठ्या प्रमाणात झाली आहे. सर्व सामान्य या महागाईने होरपळून निघाले आहे. गॅस महाग, पेट्रोल महाग, वीज महाग यामुळे ते हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी तर वीज बिलं ही अव्वाच्या सव्वा आली आहेत. वाढत्या वीज बिलाचा धसका अनेकांनी घेतला आहे. असं असताना राज्यात असं एक गाव आहे तिथल्या गावकऱ्यांना वीज बिल हे शून्य रुपये येतं. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. विशेष म्हणजे हे गाव आदिवासी गाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील सादागड-हेटी हे ते गाव आहे. राज्यातील पहिले आदिवासी सौर ग्राम म्हणून त्याची आता ओळख झाली आहे. गावात जवळपास 2400 युनिट सौर ऊर्जेची निर्मिती होत आहे. फक्त 20 दिवसात सर्व अडचणी दुर करत हे गाव सौर उर्जा वापरत आहे. त्यामुळे या गावाचे विज बील शुन्यावर आले आहे. महावितरण कंपनी -जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनाने हे करून दाखवले आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातले सादागड -हेटी या गावत सौर उर्जेची निर्मिती होत आहे. गावात वीज जोडणीसाठी एक शाळा आणि एकूण 19 घरांचा समावेश आहे. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेतील प्रतिकिलोवॅट 30 हजार रूपये अनुदानाचा लाभ मिळाला आहे. त्या माध्यमातून गावातील 19 घरांच्या छतावर प्रति एक किलोवॅटचे सौर प्रकल्प बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर शाळेसाठी एक किलोवॅटचे स्वतंत्र सौर प्रकल्प बसवण्यात आले आहेत.
एकूण 20 किलोवॅटची सौर यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे महिन्याला सरासरी 2400 युनिटची वीजेची निर्मिती होणार आहे. 100 टक्के सौर ग्राम करण्यासाठी महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेमार्फत तातडीने कारवाई करण्यात आली. त्यामुळेच 20 दिवसात संपूर्ण गाव सौर उर्जेवर आलं. हे गावत तसं जंगलाने वेढलेले. त्या गावात आता वीज आली आहे. ती ही मोफत. त्यामुळे या गावाला एक वेगळाच दिलासा मिळाला आहे.