Guru Tegh Bahadur's 350th Shaheedi Samagam in Nanded : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक आणि पवित्र सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हीच गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दिल्ली, मुंबई आणि चंदीगड या प्रमुख शहरांमधून नांदेडसाठी विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत. यामुळे पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी विशेष रेल्वेचे नियोजन
नांदेड येथे 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने रेल्वेने ट्रेन ऑन डिमांड अंतर्गत विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरून 23 आणि 24 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता विशेष एक्स्प्रेस सुटेल. ही रेल्वे पानिपत, आग्रा कॅन्ट, झाशी, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी 16:20 वाजता नांदेडला पोहोचेल.
( नक्की वाचा : Goregaon Mulund Link Road : गोरेगाव ते मुलुंड आता काही मिनिटांत; मुंबईतील सर्वात मोठ्या बोगद्याचे वाचा अपडेट )
भाविकांच्या सुविधेसाठी चंदीगड ते नांदेड (गाडी क्र. 04524/04523) आणि हजरत निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र. 04494/04493) या दोन राखीव सुपरफास्ट एक्स्प्रेसचे नियोजन करण्यात आले आहे.
चंदीगडवरून 23 आणि 24 जानेवारी रोजी सकाळी 05:40 वाजता सुटणारी गाडी अंबाला, दिल्ली सफदरजंग, आग्रा, झाशी आणि मनमाडमार्गे प्रवास करत दुसऱ्या दिवशी दुपारी 13:30 वाजता नांदेड स्थानकावर दाखल होईल. या गाड्यांमुळे उत्तर भारतातील शीख भाविकांना थेट नांदेडपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.
मुंबईकरांसाठी देखील रेल्वेची विशेष सोय
राज्याची राजधानी मुंबईतून येणाऱ्या भाविकांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड दरम्यान विशेष गाडी (गाडी क्र. 01041/01042) चालवण्यात येणार आहे.
ही रेल्वे 23 आणि 24 जानेवारी रोजी मुंबईहून दुपारी 15:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:00 वाजता नांदेडला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी नांदेडवरून 24 आणि 25 जानेवारी रोजी रात्री 23:30 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी 13:40 वाजता मुंबईला पोहोचेल. या गाडीमध्ये स्लीपर, जनरल आणि एसी कोच असे एकूण 18 डबे असणार आहेत.
( नक्की वाचा : Pune News: खंबाटकी घाटाची झंझटच संपली, 45 मिनिटांचा प्रवास आता फक्त 7 मिनिटांत ! वाचा सर्व माहिती )
प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
या विशेष रेल्वेंमुळे पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या हजारो भाविकांची सोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाने या विशेष गाड्यांच्या सुयोग्य संचालनासाठी सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत. प्रवासादरम्यान भाविकांनी गर्दीचे नियोजन आणि स्वच्छतेच्या सर्व आवश्यक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.