अक्षय कुडकेलवार, मुंबई: बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेंचा पोलीस एन्काऊंटर फेक असल्याचे स्पष्ट झालं आहे. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालानंतर राज्य सरकार तसेच गृहमंत्र्यांवर विरोधकांकडून टीका होत आहे. अशातच आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणात एक अजब दावा केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा फेक असून यासाठी पाच पोलीस जबाबदार असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. पोलिसांनी अक्षय शिंदेंने गोळीबार केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या ज्यामध्ये आरोपीचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र पोलिसांनी दावा केलेल्या बंदुकीवर अक्षयच्या हाताचे ठसे आढळले नसल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांचा दावा हा दावा खोटा ठरला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र याबाबत आता राज्याचे नवे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक अजब दावा केला आहे. पावसामुळे अक्षय शिंदे याचे बंदुकीवरील ठसे गेले असावे, असे विधान योगेश कदम यांनी केलं आहे. पोलीस आरोपीला वाचवण्याच्या धावपळीत होते. त्यावेळी पाऊस होता. त्यामुळे बंदुकीवरील ठसे गेले असावेत, अशी अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. योगेश कदम यांच्या या दाव्याने आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे. त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेचे बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजप संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर करून भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे. या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. कारण ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘ म्हणून स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटर चे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.