पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दलित मुलींना झालेले मारहाण प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. कोथरुड पोलिसांकडून तीन मुलींना ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा, अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांकडून तक्रार घेतली जात नसल्यानेही संताप व्यक्त केला जात होता. याच प्रकरणात आता राज्य महिला आयोगाकडून गंभीर चूक घडली आहे, ज्यावरुन रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणालेत रोहित पवार?
महिलांचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून नेहमी राजकीय भूमिका घेण्याची ख्याती मिळवलेल्या राज्य महिला आयोगाने अजून एक नवीन प्रताप केला आहे. कोथरूडमधील ज्या मुलींवर पोलिसांनी अश्लील व जातीवाचक शेरेबाजी केली त्यांच्या घरात चुकीच्या पद्धतीने घुसून बेकायदेशीर झाडाझडती घेतली. त्या मुलींची ओळख व नाव हे आजवर सर्वांनीच गोपनीय ठेवलं होतं मात्र झोपेतून जागे झालेल्या महिला आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये सदर मुलीचे नाव टाकले आहे. BNS S72 नुसार हा गंभीर गुन्हा आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
Pune News: दलित मुलींचा पोलिसांकडून छळ! रात्रभर ठिय्या तरी तक्रार घेण्यास नकार, संपूर्ण प्रकरण काय?
तसेच आधीच खोटी कट कारस्थाने करून अडचणीत असलेल्या मागासवर्गीय मुलींचे चारित्र्य हनन करून त्यांना पूर्णपणे नाऊमेद करण्याचं काम राज्य महिला आयोगानं केलं आहे आणि हेच ट्विट re-post करून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी देखील शोषित मुलींच्या जखमेवर मीठ चोळल. अशा या बेजबाबदार व संवेदनाहीन वागणुकीबाबत सरकारने तत्काळ महिला आयोगावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रांजल खेवलकर प्रकरणातही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मात्र रुपाली चाकणकर यांना हा अधिकार नाही, हा गोपनीयतेचा भंग आहे, अशी टीका करत खासदार सुप्रिया सुळेंनीही संताप व्यक्त केला होता.
कोथरुड पोलिसांवर कुणाचा दबाव? तक्रारीसाठी 3 तरुणींचा 15 तास ठिय्या; प्रकरण तापलं