- मंगेश जोशी, जळगाव
प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाइल आल्यापासून सोशल मीडियावर लहानांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येक जण सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते. काही जण सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करतात, तर काही जण गैरवापर करत असल्याच्याही घटना समोर येतात. जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने कसा वापर करावा? याचे ज्वलंत उदाहरण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील होळ येथील शेतकरी गणेश चौधरी यांच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
(नक्की वाचा: शेतकऱ्याच्या व्हाट्सअॅप स्टेटसची कमाल, चोरी गेलेला बैल सापडला)
गणेश चौधरी या शेतकऱ्याचे शिक्षण जेमतेम झालेले आहे. शेतीच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गणेश चौधरी यांच्याकडे असलेल्या बैलजोडीतील एक बैल अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेला. एक बैल गायब असल्याचे गणेश चौधरी यांच्या पहाटेच्या सुमारास निदर्शनास आले. आसपासच्या परिसरात बैलाचा शोध घेतल्यानंतर कुठेही शोध न लागल्याने बैलाची चोरी झाल्याचा अंदाज गणेश यांनी आला. यानंतर त्यांनी व्हाट्सअॅप स्टेटसमध्ये बैलाचा फोटो ठेवला तसेच कोणाला बैल आढळल्यास तातडीने माहिती कळवावी, असे आवाहनही केले.
(नक्की वाचा: महिला तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, वाळू माफियांचे भयंकर कृत्य)
गणेश चौधरी यांनी ठेवलेले व्हाट्सअॅप स्टेटस त्यांच्या जामनेरमधील नातेवाईकांनी पाहिले. त्याचवेळी जामनेरमधील नातेवाईकाचा मुलगा कॉलेजमध्ये जात असताना एका वाहनात बांधलेला बैल त्याने पाहिले. मुलाने गणेश चौधरीचे व्हाट्सअॅप स्टेटस पाहून खात्री करून याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शहानिशा करत हा बैल चोरीचा असल्याचे लक्षात येताच वाहन चालकाला त्यांनी ताब्यात घेतले. तसेच चोरी केलेला बैल पाचोरा पोलिसांकडे रवाना केला. चोरी गेलेला बैल पुन्हा मिळाल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
(नक्की वाचा: वाळू चोरांना उपजिल्हाधिकारी हर्षलतांकडून चोप, कराटेचे प्रशिक्षण असे आले कामी)