अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
शासकिय आणि निमशासकीय सेवांच्या लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आधार कार्ड अपडेट झालेले नसल्याने चंद्रपुरातील कित्येक विद्यार्थी आपल्या हक्कापासून वंचित राहिले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना या कारणामुळे शिष्यवृत्ती योजनेच्या लाभाशिवाय इतर शासकिय व निमशासकीय योजनांपासून वंचित राहण्याचा प्रसंग ओढवला आहे. आधार कार्ड अपडेटच्या नावाखाली बंद केलेले आधार कार्ड पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नसल्याने आता काय करायचे ? असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.
सप्टेंबर 2010 पासून अंमलतात आणलेले आधार कार्ड मिळावे म्हणून सावली तालुक्यातील बोथली येथील पाच विद्यार्थ्यांनी नियमानुसार कार्यवाही केली. कार्यवाहीअंती भारत सरकारच्या संबंधित विभागाने या विद्यार्थ्यांना आधार कार्ड देण्यात आले आणि आधार कार्डचा नियमित वापर सुरू झाला. मात्र असं असताना संबंधित विभागाने आधार कार्ड कार्यरत नाही, असे समजून मागील पाच वर्षापूर्वी ते कोणतीही पूर्वसूचना किंवा वस्तुस्थिती लक्षात न घेता बंद केले.
नक्की वाचा - विद्यार्थ्याचं अक्षर खराब म्हणून संतापली शिक्षिका, अशी दिली शिक्षा की वाचून उडेल थरकाप
हे विद्यार्थीनी जेव्हा भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी गेले त्यावेळी आधार कार्ड क्रमांक कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले. मिळालेला आधार कार्ड क्रमांक सुरू करण्यासाठी सदर विद्यार्थीनीने सावलीपासून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय ते नागपुरच्या आयुक्तालयात प्रयत्न केले. परंतू कोणाकडूनही बंद झालेले आधार कार्ड पुर्ववत सुरू होऊ शकले नाही. त्यामूळे मागील पाच वर्षापासून ह्या विद्यार्थ्यांना शालेय योजनेच्या लाभासाठी पात्र असतांना पुर्ण शुल्क भरून शिक्षण घ्यावे लागत आहे.
शिवाय केंद्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने अंमलात आणलेली एबीसीआयडी (अॅकडेमीक बँक आँफ क्रेडीट) प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याने इच्छा असतांनाही सदर विद्यार्थिनीला पुढील शिक्षण घेणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळं बंद असलेले आधार कार्ड सुरू करण्यासाठी 2022 मध्ये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे अर्ज सादर केला. सेतु केंद्रामध्ये जाऊन सहा वेळा अपटेड करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. परंतू प्रत्येक वेळेस संबंधित विभागाकडून डिअँक्टीव्ह असा मॅसेज मिळत असल्याने आता काय करायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.