चिमुकल्या देवांशीवर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे वाचला जीव

देवांशीला तिची आई मीनाक्षी गावंडे यांनी यकृताचा भाग दिला. त्यातून मुलीवर 7 जुलै 2025 रोजी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या मदतीतून वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात राहणाऱ्या सात वर्षीय देवांशी रवींद्र गावंडे हिच्यावर नुकतीच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही महागडी शस्त्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने पार पडल्याचे समाधान मुलीच्या पालकांनी व्यक्त केले. रवींद्र गावंडे रा. वरूड बु. यांच्या मुलीला जानेवारी 2025 मध्ये तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता. मुलीची अकोला आणि त्यानंतर नागपूर येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी तिचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले. तसेच तिचे यकृत तातडीने प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेसाठी 15 लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला.

भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या देवांशीच्या वडिलांसमोर एवढी मोठी रक्कम गोळा करण्याचा पेच निर्माण झाला होता. दरम्यान, मुलीच्या वडिलांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती मिळताच या कक्षाकडे त्यांनी मदत मागितली. याशिवाय सोशल मीडियावर मदतीकरिता आवाहन केले. कक्षाच्या पुढाकाराने देवांशीवर पुढील उपचार मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, टाटा ट्रस्ट, सामाजिक संस्था तसेच गावकऱ्यांच्या वर्गणीतून आर्थिक मदत उपलब्ध झाली.

नक्की वाचा - Mukhed cloudburst: मुखेडमध्ये ढगफुटी! 800 गावांना फटका, 226 लोकांची सुटका, 4 गावातले लोक फसले, सैन्याला पाचारण

देवांशीला तिची आई मीनाक्षी गावंडे यांनी यकृताचा भाग दिला. त्यातून मुलीवर 7 जुलै 2025 रोजी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आता देवांशीची प्रकृती स्थिर असून तिच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. नुकताच 3 ऑगस्ट रोजी पालकांनी तिचा वाढदिवस साजरा केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळेच आपल्या मुलीला पुनर्जीवन मिळाल्याचे समाधान देवांशीच्या पालकांनी व्यक्त केले.

नक्की वाचा - Mumbai Rains Live Updates: कुठे पाणी साचलं, कुठे वाहतूक ठप्प; मुंबईतील पावसाच्या A टू Z अपडेट्स!

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून प्रत्येक गरजू, गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. देवांशी त्याचेच एक उदाहरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कक्ष काम करत असून राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी कक्ष तत्पर आहे. या कक्षाचा फायदा सामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Advertisement