Sunetra Pawar Net Worth: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास रचला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या सत्तेच्या चाव्या सोपवण्यात आल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर आता सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पण तुम्हाला माहीत आहे का, की राज्याची ही नवी कारभारीण कोट्यवधींच्या मालमत्तेची मालकीण आहे? सुनेत्रा पवार यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे, त्यांच्याकडे किती सोन्याचे दागिने आहेत आणि त्यांची गुंतवणूक कुठे आहे, याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती
सुनेत्रा पवार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यानुसार त्यांच्याकडे प्रचंड मोठी मालमत्ता आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या प्राप्तिकर विवरणपत्रानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न 4,22,21,010 रुपये (साधारण 4.2 कोटी रुपये) इतके होते.
त्यांच्या एकूण मालमत्तेचा विचार केला तर ती 127,59,98,205 रुपये (127 कोटी रुपयांहून अधिक) इतकी भरते. यामध्ये त्यांच्या जंगम आणि स्थावर अशा दोन्ही मालमत्तांचा समावेश आहे.
( नक्की वाचा : 41 वर्षांचं सामाजिक तप अन् आता मोठी जबाबदारी; Sunetra Pawar: कशा ठरल्या बारामतीच्या विकासाच्या शिलेदार? )
जंगम मालमत्ता आणि गुंतवणूक
सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या एकूण मालमत्तेपैकी सुमारे 30.3 कोटी रुपये ही जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे असलेल्या रोख रकमेपासून ते विविध कंपन्यांच्या शेअर्सपर्यंत सर्व माहिती यात देण्यात आली आहे.
- रोख रक्कम: 7.3 लाख रुपये.
- वाहने: 86 लाख रुपये.
- बँकांमधील ठेवी: 5.3 कोटी रुपये.
- बाँड्स आणि शेअर्स: 66 लाख रुपये. यामध्ये बारामती ॲग्रो, व्हेंकीज (इंडिया) लिमिटेड, व्हीआयए क्रिएशन्स आणि बारामती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
- इतर मालमत्ता आणि दावे: 8.4 कोटी रुपये.
सोन्या-चांदीचे दागिने आणि हिरे
दागिन्यांच्या बाबतीतही सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत. त्यांच्याकडे एकूण 1.3 कोटी रुपयांचे दागिने आहेत. यामध्ये:
- 35 किलो चांदीची भांडी: ज्याची किंमत 24 लाख रुपये अंदाजित आहे.
- 1030 ग्रॅम सोन्याचे दागिने: ज्याचे 2024 मधील मूल्य 51 लाख रुपये होते.
- 28 कॅरेटचे हिऱ्यांचे दागिने: ज्याची किंमत 24 लाख रुपये आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Net Worth: अजित पवारांचे अपघाती निधन, किती श्रीमंत होते उपमुख्यमंत्री? पाहा संपत्तीचा सर्व तपशील )
स्थावर मालमत्ता आणि आलिशान घरे
सुनेत्रा पवार यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन आणि आलिशान इमारती आहेत. त्यांच्या एकूण स्थावर मालमत्तेची किंमत 97 कोटी रुपये आहे.
शेतजमीन: 13 कोटी रुपये.
बिगर शेती जमीन: 37 कोटी रुपये.
निवासी इमारती आणि फ्लॅट्स: एकूण 35 कोटी रुपये. यामध्ये पुण्यातील कल्याणी नगर येथील झिरोजी अपार्टमेंटमधील 4 कोटी रुपयांचा फ्लॅट आणि सिंध हाउसिंग सोसायटीमधील 10 कोटी रुपयांच्या फ्लॅटचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मुंबईतील शुभदा अपार्टमेंटमध्येही त्यांची मालमत्ता आहे.
देणी आणि कर्ज
मालमत्तेसोबतच त्यांच्यावर काही आर्थिक जबाबदाऱ्या देखील आहेत. सुनेत्रा पवार यांनी बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज सुमारे 16 कोटी रुपये इतके आहे. त्यांच्यावर एकूण 17 कोटी रुपयांची देणी असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.