रामराजे शिंदे, नवी दिल्ली
सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने विधी आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव आज, 16 सप्टेंबर 2025 रोजी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आणले जाईल आणि दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सोमवारी न्यायालयात त्यांना अचानक चक्कर आल्यानंतर एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते नातू होते.
सिद्धार्थ शिंदे यांची महाराष्ट्राला एक वेगळी ओळख होती. ते केवळ एक प्रभावी वकील नव्हते, तर सर्वसामान्यांना गुंतागुंतीच्या कायद्याचे विश्लेषण सोप्या भाषेत समजावून सांगणारे एक मार्गदर्शक होते. विशेषतः मराठा आरक्षण आणि राज्यातील सत्तासंघर्ष यांसारख्या महत्त्वाच्या सुनावण्यांदरम्यान, त्यांनी सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद आणि अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कायद्याचे सोपे भाष्यकार
कायदेशीर बाबींवर त्यांचे भाष्य अचूक आणि समजण्यास सोपे असल्याने अनेक प्रसारमाध्यमांमध्ये ते एक महत्त्वाचे तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहत होते. त्यांच्या अकाली निधनाने कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यामुळे आणि सोप्या भाषेत कायद्याची मांडणी करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ते सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय होते.