स्वानंद पाटील, प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात बनावट औषधं पुरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एकनाथ शिंदे सरकारमधील दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अंधारे यांनी रुग्णालयास भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर शिंदे सरकारमधील दोन मंत्र्यांना लक्ष्य केलं. या प्रकरणात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात औषध निरीक्षकांसह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुषमा अंधारे यांनी रुग्णालयास भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि अन्न औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा अत्राम (Dharmaravbaba Atram) यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. अत्राम यांच्या मंत्रालयानं कोणतीही खातरजमा न करता औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपनींना प्रमाणित केलं, असा आरोप अंधारे यांनी केला. या प्रकरणात आम्ही हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहोत. या दोन्ही नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणातील सर्व बनावट पुरवठा करण्यात आलेले औषधं हरिद्वारच्या जनावरांची औषधी कारखान्यात तयार केल्याचं समोर आलं आहे. टाल्कम पॉवडर स्टार्च आणि कॅल्शियमचा वापर करत या गोळ्या तकयार करण्यात आल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातून या गोळ्या महाराष्ट्रात पाठवण्याचे रॅकेट सक्रीय असल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
( नक्की वाचा : शरद पवारांच्या खासदारांची जीभ घसरली, भर कार्यक्रमात काढला पत्रकारावर राग )
विशेष म्हणजे अंबाजोगाईतच नव्हे तर नागपूर ठाणे वर्धा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातही या बनावट औषधांचा पुरवठा केल्याची माहिती उघड झालीय. याबाबतचा पहिला गुन्हा नागपूरमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर वर्धा भिवंडी, ठाणे, नांदेड, आणि आता अंबाजोगाई येथे याबाबतच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.