शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण निर्माण केली आहे राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी. मालीवाल यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंकडे चर्चेसाठी वेळ मागितली आहे. मालीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवले असून त्यांनी अनेक महिलांना न्याय मिळवून दिल्याचे म्हटले आहे. जिने महिलांना न्याय मिळवून दिला तीच महिला आज न्यायासाठी झगडत असल्याचं मालीवाल यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. याच संदर्भात मला आपल्यासोबत चर्चा करायची असून त्यासाठी आपण वेळ द्यावा ही विनंती असेही मालीवाल यांनी पत्रात नमूद केले आहे.
(ट्रेडिंग न्यूज: लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींचा नकार, आता 'ही' 3 नावे चर्चेत)
मालीवाल यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "खासदार झाल्यानंतर 13 मे 2024 रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या पीएने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. या अत्यंत क्लेशकारक घटनेनंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली. वाईट या गोष्टीचे वाटते की, ही तक्रार केल्यानंतर मला आधार देण्याऐवजी माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न सुरू झाला. या सगळ्यामागे माझ्याच पक्षाचे नेते आणि पदाधिकारी होते. माझी प्रतिमा, चारित्र्य आणि विश्वासार्हता धुळीस मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावरून मोहीम राबविण्यात आली. माझ्याविरुद्ध खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या. तुला ठार मारू, तुझ्यावर बलात्कार करू, अशाही मला धमक्या देण्यात आल्या".
(ट्रेडिंग न्यूज: मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकार अॅक्शन मोडवर, घेणार मोठा निर्णय?)
एखाद्या पीडितेला न्याय मिळवताना काय त्रास, वेदना सहन कराव्या लागतात, हे मी गेला महिनाभर सहन करत आहे. माझ्याविरोधात अत्यंत घृणास्पद, चारित्र्यहनन करणारी मोहीम चालवण्यात आली. ही मोहीम पाहून इतर महिला-तरुणी अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी कचरतील, अशी भीती वाटते. मला या गंभीरविषयासंदर्भात चर्चा करायची असून त्यासाठी मला आपली वेळ हवी आहे. मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहात आहे."
(ट्रेडिंग न्यूज: लोकसभेनंतर काँग्रेस विधानसभेच्या तयारीला, 'या' राज्यांवर आहे लक्ष)
सत्ताधारी भाजपप्रणित एनडीएविरोधात इंडिया आघाडी तयार करण्यात आली आहे. या आघाडीमध्ये शिवसेना असून यात अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष देखील आहे. स्वाती मालीवाल यांनी जे आरोप केले आहेत ते विभव कुमार यांच्याविरोधात केले असून ते केजरीवाल यांचे पीए आहेत. केजरीवाल आणि त्यांचे नेते विभव कुमार याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मालीवाल यांनी यापूर्वी केला आहे. त्यामुळे मालीवाल यांच्या पत्राची दखल कशी घ्यायची ही अडचण उद्धव ठाकरे यांच्यासमोर निर्माण झाली आहे. देखल घेतली तरी समस्या आणि नाही घेतली तरी समस्या अशी अडचण उद्धव ठाकरेंपुढे निर्माण झाली आहे. या अडचणीवर उद्धव ठाकरे कशी मात करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.