माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याच्या अपहरण नाट्यामध्ये नवा ट्विस्ट समोर आला आहे. ऋषिराज सावंत हा 68 लाख खर्च करून खासगी चार्टर्डने बँकॉकच्या दिशेने गेला होता. हे विमान अंदमान निकोबारपर्यंत गेलं होतं. मात्र तातडीने हे विमान चेन्नईला लँड करण्यात आलं आणि तिथूनच त्याला पुण्याला बोलावून घेण्यात आलं. रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान ऋषिराज सावंत हा पुण्यात दाखल झाला. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होता. तब्बल 68 लाख रुपये खर्च करून तानाजी सावंत यांचा चिरंजिव बँकॉकला निघाला होता, अशी माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. ज्या खासगी चार्टर्डने ऋषिराज सावंत बँकॉकला निघाले होते. त्या खासगी चार्टर्डच्या ॲाफिसचा पत्ता नवी पेठेतील आहे. त्या इमारतीमध्ये एनडीटीव्हीची टीम पोहोचली. मात्र त्या ठिकाणी खासगी विमान भाड्यानं देणाऱ्यांचं ऑफीसच नसल्याचं दिसून आलं आहे. दोन वर्षांपूर्वीच येथून ऑफिस दुसरीकडे हलविण्यात आलं आहे. गंभीर बाब म्हणजे काल विमानतळ अॅथोरिटीला परवानगीसाठीचं जे पत्र देण्यात आलं त्या पत्रावर मात्र पुण्यातील नवी पेठेतील इमारतीचा पत्ता आहे. त्यामुळे ही कंपनी अस्तित्त्वात आहे की नाही? हे विमान कोणाच्या मालकीचं आहे? यंत्रणेकडून या कंपनींची पडताळणी करण्यात आली की नाही? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
नक्की वाचा - Pune News : तानाजी सावंत यांच्या सुपुत्राचं अपहरण नाही तर स्वखुशीने 68 लाख खर्च करून बँकॉक टूर
कौटुंबिक कारणासाठी सरकारी यंत्रणेचा वापर?
10 फेब्रुवारी रोजी तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषिराज सावंत यांचं अपहरण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र यामध्ये सावंत यांच्या ड्रायव्हरनेच त्यांना पुणे विमानतळावर सोडल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे काही वेळानंतर ऋषिराजचं अपहरण झालं नसल्याचं स्पष्ट झालं होतं. काही कौटुंबिक कारणातून ही गोष्ट घडल्याचं सांगितलं जात होतं. मात्र यानंतरही अपहरणाचं कारण सांगत तानाजी सावंत यांनी सरकारी यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ही कार्यक्षमता संतोष देशमुख हत्या प्रकरणात का दाखविण्यात का आली नाही, असाही सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.