एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांना वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी न्यायालयाने शिक्षा सुनावल्याची एक दुर्मिळ घटना ठाण्यात घडली आहे. दिवाणी आणि सत्र न्यायालय, ठाणे येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी 12 सप्टेंबर रोजी दोन स्वतंत्र निकालांद्वारे दोन सख्ख्या भावांना दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. विशाल आणि विष्णू अळगेंदे अशी या दोघांची नावे आहेत. यातील एकाने आपल्या आईची स्क्रू ड्रायव्हरने भोसकून हत्या केली होती, तर दुसऱ्या भावाने कुटुंबातील सदस्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. या दोन्ही गुन्ह्यांची पार्श्वभूमी कौटुंबिक वादाची असल्याचे दिसून आले आहे.
नक्की वाचा: मुंबई हादरली! नामांकित शाळेत 4 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, एका महिला कर्मचाऱ्याला बेड्या
20 रुपयांवरून वाद, आईची हत्या
यातील पहिला निकाल विशाल अरुण अळगेंदे याच्या संदर्भात होता. त्याने 2021 साली आपल्या आईची केवळ 20 रुपयांच्या वादातून हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालला त्याच्या आईकडून दररोज रिक्षाच्या भाड्यासाठी 20 रुपये मिळायचे. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि संतापलेल्या विशालने आपल्याच आईवर स्क्रू ड्रायव्हरने तब्बल 50 वार करून तिचा जीव घेतला. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
नक्की वाचा: आईच्या चेहऱ्यावर ठोसे मारत मुलानं घेतला जीव ! धक्कादायक घटनेचा Video पाहून उडेल थरकाप
दुसऱ्या भाऊ आजी आणि काकाला मारहाण प्रकरणी दोषी
दुसऱ्या प्रकरणात, विशालचा भाऊ विष्णू याला न्यायालयाने 2016 साली आपल्या आजी आणि काकावर हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरवले. या प्रकरणात आरोपी विष्णूला 1 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विष्णूवर त्याच्या वडिलांच्या हत्येचाही आरोप होता, परंतु पुराव्याअभावी न्यायालयाने त्याला या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांनी वेगवेगळ्या वेळी केलेल्या गुन्ह्यांची सुनावणी एकाच दिवशी पूर्ण होऊन त्यांना शिक्षा सुनावल्याची ही घटना न्यायव्यवस्थेतील एक दुर्मिळ घटना आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये सरकारी पक्षाची बाजू ए. पी. लाडवंझारी आणि रश्मी क्षीरसागर यांनी प्रभावीपणे मांडली होती. तर आरोपींच्या बाजूने सागर कोल्हे आणि संजय गायकवाड याा वकिलांनी युक्तिवाद केला होता.