
Thane Ghodbunder News: वाहतुक कोंडी हा मुंबईकरांसाठी मोठी समस्या आहे. रेल्वे प्रवासातील गर्दी टाळण्यासाठी रस्ते मार्गाचा अवलंब करणाऱ्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा तासाभराच्या प्रवासासाठी दुप्पट आणि पाऊस, सण-उत्सवाच्या काळात तिप्पटही वेळ लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते यामुळे हा प्रवास त्रासदायक वाटू लागतो.
त्यातही ठाणे ते बदलापूरदरम्यान रस्ते प्रवासात नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते. येथील रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आधीच वाहतूक धीमी असते. त्याशिवाय मोठमोठ्या वाहनांमुळेही वाहतुकीवर परिणाम होतो. दरम्यान प्रवाशांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. ठाणे ते बदलापूरपर्यंत अवजड वाहनांना (10 चाकी किंवा त्याहून जास्त) दिवसा प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. घोडबंदर रोड ते बदलापूरपर्यंतच्या मार्गात सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहनांही मध्यरात्रीपूर्वी न सोडण्याचं निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय अहमदाबादहून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही हे नियम असतील.
नक्की वाचा - Monorail News : मुंबईकरांनो, मोनोरेल तात्पुरती बंद; हजारो प्रवाशांना बसणार फटका! वाचा काय आहे कारण?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. आढावा बैठकीत एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. या एका निर्णयामुळे हजारो प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. यासाठी शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना समन्वय समितीचं नेतृत्व करण्यास सांगितलं आहे. ही समिती ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई पोलीस, पालघर जिल्हा प्रशासन, मीरा-भाईंदर पोलीस आणि इतर नागरी संस्थांसोबत काम करेल.
घोडबंदर किंवा जेएनपीटीहून येणाऱ्या जड वाहनांनी रस्त्याच्या कोपऱ्यात उभे राहू नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंचोटी, अच्छड येथे वाहनतळासाठी जागा देण्याची मागणी केली आहे. येथे पुढील परवानगी मिळेपर्यंत ट्रकला थांबवा येईल.
कधीपासून प्रवेशबंदी होणार सुरू...
प्राथमिक पातळीवर 18 सप्टेंबरपासून अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू असेल. 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू असेल. अवजड वाहने मध्यरात्री वाहतूक करू शकतील. ही अधिसूचना प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली असली तरी यावर हरकती न आल्यास ही अधिसूचना पुढील आदेश होईपर्यंत कायमस्वरुपी लागू राहणार असल्याची माहिती आहे. दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-नवी मुंबई येथून आनंदनगर चेकनाकामार्गे ठाणे शहरात येणाऱ्या आणि गुजरात येथून घोडबंदरमार्गे वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world