Mumbai Perfume Gang Shocking Incident With Girl Video: मुंबईमध्ये लोकल प्रवासावेळी अनेक फिरते विक्रेते परफ्युम, घरगुती साहित्य, कपडे अशा वस्तू विकताना दिसतात. यांपैकी अनेकजण आपल्या वस्तू घेण्याचा आग्रह करतात. आपणही अनेकदा मदत म्हणून या वस्तू विकत घेतो. मात्र प्रवासादरम्यान अशा विक्रेत्यांशी संवाद साधणे, त्यांच्याकडून वस्तू विकत घेणे, अत्यंत धोक्याचे ठरू शकते. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने ठाणे स्टेशनवर तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. सोबतच सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहनही तिने केले आहे.
तरुणीसोबत धक्कादायक प्रकार
इंस्टाग्रामवर आकांशा परब या तरुणीच्या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्यो तिने ठाणे स्टेशनवर तिच्यासोबत परफ्युम विक्रेत्याचा आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. तरुणीने सांगितले की, ती ठाणे स्टेशनवर शॉपिंगसाठी गेली होती. गोल्डन सिनेमा लेनमध्ये ती तरुणी खरेदी करत होती. त्याठिकाणी एक परफ्युमवाला आला आणि त्याने परफ्युम खरेदी करण्याची विनंती केली. त्यावेळी तिने त्या व्यक्तीची वस्तू खरेदी करण्यास नकार दिला.
पुढे या तरुणीने सांगितले की, अर्ध्या तासानंतर ती कपड्याच्या दुकानातून बाहेर आली. तेव्हाही तो परफ्युमवाला तिथेच होता. त्याने पुन्हा परफ्युम घेण्याची विनंती केली. यावेळी समोर असलेल्या एका तरुणाने हातवारे करुन तिला त्याच्याकडून वस्तू न घेण्याचा इशारा केला. त्याला याबाबत विचारल्यानंतर त्याने तो तुला परफ्युम विकत नाही, त्याच्याकडून घेऊ नकोस असं सांगितले. तरुणीला हा प्रकार काही समजला नाही.
परफ्युम गँगपासून सावध रहा
दुसऱ्या दिवशी या तरुणीला एका दुकानदाराकडून समजले की हे लोक परफ्युम विकण्याच्या बहाण्याने जवळ येतात. परफ्युमचा स्मेल देऊन आपल्याला भुलवतात आणि जवळ असलेले दागिने, वस्तू काढून घेतात. अनेकदा आपण अशा लोकांशी प्रेमाने वागतो त्यांना मदत करण्याच्या हेतूने संवादही साधतो मात्र असे करणे धोकादायक आहे. त्यामुळे काळजी घ्या, सतर्क राहा असे आवाहन या तिने केले आहे. दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत आपल्यासोबतही असा प्रकार घडल्याचे अनुभव सांगितले आहेत. या कमेंट्समध्येच एका तरुणाने मुंबईत फिरताना काय काळजी घ्यावी याबाबत सुंदर माहिती शेअर केली आहे.
काय घ्याल काळजी? How to take care
१. "मदत करण्यापूर्वी सतर्क राहा: अनेकदा लोक 'गाडीचा खर्च संपलाय' किंवा 'पैसे हरवलेत' असे सांगून भावनिक साद घालतात. जर कोणी मदतीची मागणी करत असेल, तर त्यांना जवळच्या पोलीस स्टेशनचा पत्ता सांगा किंवा 'माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत' असे स्पष्टपणे सांगून पुढे निघून जा. तुमची दयाळूपणा तुमची कमजोरी ठरू देऊ नका.
वस्तूंना स्पर्श करणे किंवा वास घेणे टाळा: सेंट (Perfume) विकणारे लोक अनेकदा हातावर स्प्रे मारण्याचा किंवा वास घेण्याचा आग्रह करतात. यात गुंगीचे औषध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा लोकांकडून कोणतीही वस्तू हातात घेऊ नका. "मला गरज नाही" असे ठामपणे सांगा. त्यांच्याशी जास्त संवाद वाढवू नका.
सुरक्षित अंतर राखा: अनोळखी व्यक्ती जेव्हा बोलण्यासाठी तुमच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते धोक्याचे लक्षण असू शकते. बोलताना नेहमी किमान ३-४ फुटांचे अंतर ठेवा. जर ती व्यक्ती जवळ येत असेल, तर लगेच पाठीमागे सरका आणि गर्दीच्या ठिकाणी जा.
तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका: काही लोक बोलता बोलता तुम्ही कुठे राहता, कुठे जाता अशी माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. कधीही अनोळखी व्यक्तीला आपला फोन नंबर, पत्ता किंवा घरची माहिती देऊ नका.
घाईत असल्याचा बनाव करा: फसवणूक करणारे लोक अशा मुलींना शोधतात ज्या शांतपणे उभे राहून त्यांचे ऐकून घेतात. ररस्त्याने चालताना नेहमी आत्मविश्वास ठेवा. कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर मी खूप घाईत आहे, मला उशीर होतोय असे म्हणून तिथून निघून जा. फोनवर बोलण्याचे नाटक करणे हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो.
मुलींनी काळजी घ्या: विशेषत: मुलींनी सहज उपलब्ध व्हाल असे दिसू नका: नेहमी कान आणि डोळे उघडे ठेवून चाला, हेडफोन लावून चालणे टाळा. जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमचा पाठलाग करत आहे, तर लगेच जवळच्या दुकानात किंवा गर्दीच्या ठिकाणी शिरा. जर कोणी अतिप्रसंग किंवा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, तर शांत बसण्यापेक्षा ओरडून लोकांचे लक्ष वेधून घ्या. तुमची सुरक्षितता तुमच्या हातात आहे. सतर्क राहा, सुरक्षित राहा