लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पंकजा यांच्यासाठी जसा हा धक्का होता तसा तो भाजपसाठीही होता. पंकजा मुंडे या पक्षातला ओबीसी चेहरा आहेत. त्यात आता राज्यात एकीकडे मराठा आरक्षणामुळे वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही मैदानात शड्डू ठोकला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. अशा वेळी पंकजा यांच्या सारखा ओबीसी चेहऱ्याला मोठी संधी देण्याचा विचार भाजप श्रेष्ठी करत आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका भाजपला बसला. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यात मराठा बरोबरच ओबीसी समाजाची नाराजी भाजपला ओढवून घेणे महागात पडणार आहे. याचा विचार करता पंकजा यांच्यासाठी भाजप श्रेष्ठी थोडा वेगळा विचार करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार?
पंकजा मुंडे यांचा पराभव ओबीसी समाजाच्या जिव्हारी लागला आहे. बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशीच लढत झाल्याची चर्चा आहे.लोकसभा निवडणुकीत मराठा समाज भाजपच्या विरोधात गेल्याचे चित्र आहे. आता ओबीसी समाजही नाराज आहे. त्यामुळे तोही विरोधात जातो की काय अशी भिती भाजपला आहे. अशा वेळी पंकजा मुंडे यांना पुन्हा एक मोठी संधी दिली जावू शकते. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. आगामी काळात राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे.या ठिकाणी पंकजा यांना संधी देण्याची गरज असल्याचे राज्याच्या नेतृत्वाने केंद्रीय नेतृत्वाला सांगितले आहे.
ट्रेंडिंग बातमी - तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णचं राहीलं, शेतकऱ्याच्या लेकीचं टोकाचं पाऊल
या आधीही केली होती शिफारस
विधानसभेत पराभव झाल्यानंतर ही पंकजा यांना विधान परिषदेवर घेतले जावे याची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. पंकजा या लोकनेत्या आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय त्या ओबीसी असल्याने ओबीसींचाही मोठा पाठिंबा त्यांना आहे. या गोष्टी लक्षात घेता त्यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी शिफारस एकदा नाही तर दोन वेळा करण्यात आली होती. पंकजा यांचे पुनर्वसन त्यांच्यासाठी नाही तर ओबीसी मतपेढीच्या दृष्टीनेही महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे. याकडे भाजप पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्यात आले आहे.
ट्रेंडिंग बातमी - आजही तिहारमधून सुटका नाहीच, दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांच्या जामीनावर स्थगिती
पंकजांची लॉटरी लागणार?
लोकसभेला भाजपने सपाटून मार खालला आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळी भाजपला थोडा वेगळा विचार करावा लागेल. सामाजिक गणित योग्य पद्धतीने बांधावी लागतील. या बांधणीत पंकजा मुंडे यांना कुठेतर बसवणे गरजेचे झाले आहे. असे केल्यास भाजपला त्याचा फायदा होईल असे राजकीय विश्लेष्कांचे ही म्हणणे आहेत. महिला त्यात ओबीसी आणि त्यांना असलेला जनाधार लक्षात घेता पक्षश्रेष्ठी पंकजा यांच्या बाबत वेगळा विचार नक्की करतील असे बोलले जात आहे.