मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी खंबीर भूमीका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. यातून आता मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमने सामने आले आहेत. भुजबळांचे राजकीय करिअर संपवणार, त्यांना सोडणार नाही असा पणच जरांगे पाटील यांनी केला आहे. तर काही झाले तरी ओबीसींच्या हक्कासाठी हा भुजबळ रस्त्यावर उतरेल मागे हटणार नाही असा जोरदार पलटवार भुजबळांनी केलाय. त्यामुळे भुजबळ विरूद्ध जरांगे यांच्यातले वाकयुद्ध रंगले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल
मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यावे लागले तरी चालेल पण मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा देणार असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलना मागे छगन भुजबळ आहेत. भुजबळ सांगतात तसेच ते बोलत असतात असा आरोपही त्यांनी केलाय. शिवाय भुजबळांनी आधी मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी मराठा धनगर यांच्यात भांडणं लावली आहेत असा आरोप केला. त्यामुळे भुजबळांना सोडणार नाही असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत. तर भुजबळांचे राजकीय करिअरही संपवणार असे ही ते म्हणाले. सरकार मराठा समाजाला चिल्लर समजत आहे का? असा सवालही त्यांनी केला. मराठा समजा एकत्र आला आहे ही खरी सरकारची पोटदुखी असल्याचे ते म्हणाले. काही झाले तरी मराठा समाजाला न्याय मिळवून देणार अशी भूमीका जरांगे यांनी घेतली आहे.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंच्या मतदार संघात पोस्टर वॉर, मनसेच्या 'त्या' पोस्टरची चर्चा
जरांगेंना भुजबळांचे सडेतोड उत्तर
मनोज जरांगे यांच्या इशाऱ्याला छगन भुजबळांनी केराची टोपली दाखवली आहे. माझं करिअर संपवणं किवा वाढवणं हे माझ्या पक्षाच्या हातात आहे. त्या पेक्षा ते जनतेच्या हातात आहे. त्यामुळे असले इशारे भुजबळला कुणी देवू नये. काही झालं तर हा भुजबळ ओबीसी समजासाठी शेवटपर्यंत लढेल. रस्त्यावर उतरून लढेल असे जोरदार प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. या आधी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यात आमदारकी काय चिज आहे असेही ते म्हणाले. दरम्यान मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जावे. शिवाय ज्यांनी कुणबीचे खोटे दाखले घेतले आहेत त्यांच्यावर आणि दाखले देणारे याच्यावरही कारवाई केली जाईल. ते दोघेही दोषी आहेत असे भुजबळ यावेळी म्हणाले. शिवाय मराठा समाजाला सारथीच्या माध्यमातून अनेक सुविधा मिळत आहे. येवढे मिळत असताना अजून काय हवे आहे अशी विचारणाही भुजबळ यांनी केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - पेपर फुटी विरोधातील कायदा मध्यरात्रीपासून लागू,'या' आहेत कडक तरतूदी
हाकेंच्या भेटीला शिष्टमंडळ
ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देवू नये या मागणीसाठी गेल्या दहा दिवसा पासून प्रा. लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहे. त्यांची विवीध मान्यवरांनी भेट घेतली आहे. सरकारचे शिष्टमंडळही त्यांच्या भेटीला आले होते. छगन भुजबळही आज त्यांची भेट घेणार आहेत. शिवाय उपोषण मागे घ्यावे अशी विनंतीही ते यावेळी करतील. एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण या कचाट्यात सरकार सापडले आहे.लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला. आता विधानसभा निवडणुका आहे. त्यामुळे यातून योग्य तोडगा काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे.