ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये साठी गेल्या दहा दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको ही त्यांची प्रमुख मागणी आहे. सर्वसामान्य धनगर कुटुंबात जन्मलेला मुलगा ते ओबीसी नेता असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. निवडणुकीच्या आखाड्यात यश आले नाही तरी हरकत नाही, समाजासाठी झटक राहाणार अशी त्यांची भूमीका राहीली आहे. धनगराचा पोरगा ते प्राध्यापक आणि नंतर ओबीसींचा नेता असा प्रवास लक्ष्मण हाकेंचा राहीला आहे.
मेंढपाळ घरात झाला जन्म
लक्ष्मण सोपान हाके असे त्यांचे संपुर्ण नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या जुजारपूर इथं मेंढपाळ घरात त्यांचा जन्म झाला. सोपान हाके हे त्यांचे वडिल. आजही ते मेंढपाळ म्हणून काम करतात. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात्या हद्दीवर जुजारपूर हे हाकेंचे गाव आहे. लक्ष्मण हाके मेंढीपालन करत करत शिक्षण केले. सांगोला, सांगली पुणे असा त्यांनी शिक्षणासाठी प्रवास केला. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून नोकरीला सुरुवात केली होती.
नोकरी सोडली समाजासाठी समाजकारणात
नोकरी करत असतानाच ते धनगर आणि ओबीसी चळवळीत ओढले गेले. त्यांनी चांगल्या पगारीची नोकरी सोडली. समाजासाठी समाज कार्यात पडले. पुर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून ते काम करू लागले. सुरुवातीला त्यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून काम केले. पुढे ते राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या संपर्कात आले. त्यांनी जानकरांबरोबर काम करण्यास सुरूवात केली.सोलापूर जिल्ह्याचे रासपचे जिल्हाध्यक्ष म्हणून लक्ष्मण हाके यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी धनगर समाजासाठी संपुर्ण राज्यात दौरे केले.
2014 साली धनगर समाजासाठी उपोषण
लक्ष्मण हाके हे 2004 पासून सक्रीय समाजकारणात सक्रीय झाले. धनगर समाजासाठी त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. धनगरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी बारमती इथे उपोषण केले होते. ओबीसी समाजासाठी त्यांनी वेगवेगळी आंदोलने केली. पण पुण्या पोतराजच्या वेशात त्यांनी केलेले आंदोलन हे सर्वांच्याच लक्षात राहीले.
मागसवर्ग आयोगाचे सदस्य
हाके हे पुढे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संपर्कात आले. त्यांच्या माध्यमातून हाके यांची वर्णी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी लागली. मात्र पुढे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. मराठा आरक्षणासाठी दबाव येत असल्याचे कारण त्यांनी त्यावेळी दिले. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. पुण्यात झालेल्या एमपीएससीच्या आंदोलनातही त्यांनी उडी घेतली होती.
लोकसभा विधानसभा निवडणुकही लढवली
लक्ष्मण हाके यांनी विधानसभे बरोबरच लोकसभा निवडणुकही लढवली होती. पहिल्यांदा त्यांनी सांगोला विधानसभा निवडणूक लढवण्याचे 2014 साली ठरवले होते. मात्र त्यावेळी त्यांनी शेकापला पाठिंबा दिला. त्यानंतर 2019 ची निवडणूक ते लढले पण त्यांचा पराभव झाला. आता 2024 ची लोकसभा निवडणूक माढा मतदार संघातून लढले. पण त्यांच्या पदरी पुन्हा एकदा पराभव पडला. त्यांना त्यांचे डिपॉझिटही वाचवता आले नाही.
लक्ष्मण हाकेंचे उपोषण कशासाठी ?
एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहे. त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले. काही करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देवू नये अशी त्यांची मागणी आहे. शिवाय जरांगेंची सगेसोयरेची मागणी मान्य करू नये. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येवू नयेत अशीही त्यांची मागणी आहे. शिवाय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमीही त्यांना सरकारकडून हवी आहे. यासाठी त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे ते राज्याच्या राजकारणा प्रकाशझोतात आले आहे.