Pandharpur Token Darshan : सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती! विठ्ठलाचं दर्शन अवघ्या एका तासात, अखेर टोकन दर्शन सुरू 

इतर वेळेस विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत तीन तासांपर्यंत वेळ लागत होता. तर आषाढी यात्रा काळात ३० तासापर्यंत भाविकांना उभं राहून माऊलीच्या दर्शनाची प्रतीक्षा करावी लागत होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी/ पंढरपूर 

महाराष्ट्रातील तमाम विठ्ठल भक्तांची प्रतीक्षा आता संपली आहे. तिरुपती बालाजीप्रमाणे अगदी दिलेल्या वेळेत टोकन पद्धतीनं विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे. आजपासून पंढरपूर विठ्ठल मंदिरात टोकन पद्धतीने दर्शन घेण्याच्या प्रणालीस सुरुवात झाली आहे. विठ्ठलाचे टोकन दर्शन आज प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे. सकाळी १० ते ११ या एका तासाच्या पहिल्या स्लॉटमध्ये 200 भाविकांना मंदिरातील विशेष प्रवेशद्वाराने सोडण्यात आलं. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रथम भाविकाच्या टोकन दर्शनाचे स्कॅन करून त्यांना प्रवेश दिला आहे. प्रथम येणाऱ्या दहा भाविकांवर मंदिर समितीच्या वतीने पुष्पृवृष्टीही करण्यात आली. त्यामुळे भाविकांना आता दिलेल्या वेळेत अगदी सहज आणि सुलभरीत्या एक तासात दर्शन घेता येणाप आहे.

इतर वेळेस विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत तीन तासांपर्यंत वेळ लागत होता. तर आषाढी यात्रा काळात ३० तासापर्यंत भाविकांना उभं राहून माऊलीच्या दर्शनाची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र हीच वेळ आता टोकन दर्शनामुळे एक तासावर आली. दरम्यान या टोकन प्रणाली कायम ठेवण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे. यावर मंदिर समितीकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. 

Advertisement

टोकन दर्शनामुळे अवघ्या एक तासाच्या आत भाविकांना घडलं विठ्ठल दर्शन

तिरुपती बालाजी प्रमाणे पंढरपुरात विठ्ठलाचे टोकन दर्शन सुरू झाल्याने एका तासाच्या आतच भाविकांना माऊलीचं दर्शन घडलं आहे. आज १५ जून रोजी सकाळी पावणेदहा वाजता पहिल्या भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. यानंतर पुढील अवघ्या 25 मिनिटात भाविकांचे दर्शन घडले गेले आहे. त्यामुळे टोकन दर्शना सुविधा कायमस्वरूपी असावी, अशी मागणी आता भाविकातून होत आहे. टोकन दर्शन झाल्यानंतर कमी वेळात दर्शन मिळाल्याचा आनंद भाविकांनी व्यक्त केला. तर टोकन दर्शन सुरळीत होत असताना काही त्रुटींचा अभ्यास करून कायमस्वरूपी दर्शन सुरू ठेवण्याचा मानस मंदिर समितीने व्यक्त केला. 
 

Advertisement
Topics mentioned in this article