मंगेश जोशी, प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातल्या एका कर्तबगार मुलीचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भाग्यश्री दीपक पाटील असं या तरुणीचं नाव आहे. जानवे येथून दुचाकीवर दुधाचे कॅन घेऊन ती अमळनेरकडे जात होती. त्यावेळी अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. या अपघातामध्ये तिचा मृत्यू झाला. वडिलांचा आधार ठरलेल्या भाग्यश्रीचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वडिलांचा आधार गमावला
जानवे गावातील भाग्यश्री पाटील ही तरुणी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील होती. वडिलांचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होता मात्र शालेय जीवनापासून भाग्यश्री ही धाडसी आणि जिद्दी वृत्तीची होती. पोलीस अधिकारी व्हावं असं तिचं स्वप्न होतं. मात्र कुटुंबासाठी वडील करत असलेले परिश्रम यामुळे शालेय जीवनापासूनच भाग्यश्री आपल्या वडिलांच्या कामात हातभार लावू लागली. पशुपालनापासून ते दूध काढण्यापर्यंत भाग्यश्री वडिलांना हातभार लावू लागली. तर काढलेले दूध गावोगावी पोहोचवण्याचे काम देखील भाग्यश्री करू लागली.
हे करत असताना भाग्यश्रीने अभ्यासाकडे थोडेही दुर्लक्ष केले नाही. ती 2021/22 मधील दहावीच्या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. दहावीनंतर महाविद्यालयात प्रवेश घेऊन भाग्यश्री नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेतही भाग्यश्रीने उत्तीर्ण होत चांगले यश मिळवले. मात्र गेल्या काही महिन्यापूर्वी भाग्यश्रीचे वडील दीपक पाटील यांचा अपघात झाल्याने त्यांना दुचाकी चालवायला डॉक्टरांनी मनाई केली होती. त्यामुळे भाग्यश्रीचे वडील दीपक पाटील यांच्यासमोर परिवाराच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट निर्माण झाले होते.
( नक्की वाचा : जळगावच्या जवानाला कडक सॅल्यूट! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आला फोन, तातडीनं झाला देशसेवेसाठी रवाना )
पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण
धाडसी वृत्तीच्या भाग्यश्रीने वडिलांच्या अपघातानंतर वडिलांचा संपूर्ण व्यवसाय एक हाती आपल्या ताब्यात घेत वडिलांच्या व्यवसायात अजून भरारी आणली. स्वतः दुचाकीवर 100 किलोमीटरचा प्रवास करत दूध पोचवण्याचं काम भाग्यश्री एकटी करत होती त्यामुळे तिच्या हिम्मतीचे परिसरात कायम कौतुक केले जात होते. बारावीच्या परीक्षेनंतर पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असलेल्या भाग्यश्रीने दुग्ध व्यवसायासोबतच पोलीस भरतीसाठी सरावही सुरू केला होता. मात्र नियतीला काही वेगळच मान्य होतं.
कसा झाला अपघात?
भाग्यश्री ने 12 मे रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे गुरांच्या गोठ्यात गाई म्हशींचे दूध काढले. काढलेले दूध कॅनमध्ये दुचाकीने अमळनेरकडे घेऊन जात असताना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील लोंढवे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने भाग्यश्रीच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात रस्त्यावर पडलेल्या झाडावर भाग्यश्रीची दुचाकी धडकल्याने डोक्याला गंभीर मार लागला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने भाग्यश्री ची प्राणज्योत मालवली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी भाग्यश्रीला अमळनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भाग्यश्रीला मृत घोषित केले. या घटनेनं भाग्यश्रीच्या कुटुंबावर व तिच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वांसाठी प्रेरणा देणारी भाग्यश्री अचानक निघून गेल्याने जानवे गावासह अमळनेर तालुक्यावर शोककळा पसरली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दीपक पाटील यांचे भाग्य उजळणाऱ्या भाग्यश्रीचा आधार हरपल्याने त्यांच्या जीवनात मात्र अंधार पसरला आहे.