विशाल पुजारी
देशातील पहिली तृतीयपंथीयांची 'आपत्ती व्यवस्थापन टीम' तयार होत आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत, कोल्हापूर जिल्ह्यात देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करण्यात आली आहे. या विशेष टीमसाठी 27 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून राजाराम तलाव येथे दोन दिवसीय 'पूर व्यवस्थापन प्रशिक्षण' कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे.
आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या तृतीयपंथीयाना आपत्ती व्यवस्थापनाचे खडतर प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये महापुराच्या काळात मोटर बोट कशी चालवावी?, पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला सुखरूप बाहेर कसे काढावे? पाण्यातून बाहेर काढलेल्या बेशुद्ध व्यक्तीला प्रथमोपचार (First Aid) देऊन शुद्धीवर कसे आणावे? इन्फ्लेटेबल बोट (हवेची बोट) वेळेवर कशी तयार करावी आणि काम झाल्यानंतर ती कशी सुरक्षित ठेवावी यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि तांत्रिक बाबींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण पहिल्या दिवशी देण्यात आले.
या ऐतिहासिक मोहिमेत कोल्हापुरातील 'मैत्री' तृतीयपंथीय संघटनेच्या सदस्यांनी अत्यंत उत्साहाने धैर्याने सहभाग घेतला. यावेळी मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर यांच्यासह शिवानी गजबर, झोया, सुलभा, वैशाली, मोगरा आदी तृतीयपंथीयाना प्रशिक्षणासाठी आवर्जून उपस्थित होत्या. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन पथकातील तज्ज्ञ प्रशिक्षक आणि आपदा मित्र कृष्णात सोरटे, प्रथमेश येरुडकर, रोहित जाधव, सोमनाथ सुतार, शैलेश हांडे, प्रीतम केसरकर, सुदेश चव्हाण, आदिनाथ कांबळे, अविनाश चरापले, अमर पाटील आणि साहिल कोळी यांनी या भगिनींना प्रत्यक्ष पाण्यात उतरून प्रशिक्षण दिले.
याच कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील साधारण 20 'आपदा सखींना' देखील पूर व्यवस्थापनाचे उजळणी प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे विशेष प्रशिक्षण दोन दिवस चालणार असून, 27 मे 2026 आणि 28 मे 2026 असे दोन दिवस हे सत्र राजाराम तलावावर सुरू राहणार आहे. आपत्तीच्या काळात समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याच्या कोल्हापूर प्रशासनाच्या या पॅटर्नचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे.