
Hotel Bhagyashree Viral Video: सोशल मीडियावर कोण कधी अन् कसे व्हायरल होईल काही सांगता येत नाही. इन्टाग्राम, फेसबूकवर रील्स बनवून अनेक जण रातोरात चर्चेत येत असतात. सध्या अशीच एका हॉटेल व्यवसायिकाची सोशल मीडियावर तुफान म्हणजे तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. हॉटेल भाग्यश्री या नावाने असलेल्या या हॉटेल चालकाने बायकोच्या बर्थडेला नवी कोरी फॉर्च्यूनर गाडी घेतली अन् माध्यमांवर एकच चर्चा सुरु झाली. नेमकं काय आहे हे हॉटेल भाग्यश्री प्रकरण अन् काय होतेय इतकी चर्चा? जाणून घ्या सविस्तर....
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हॉटेल भाग्यश्रीची का होतेय चर्चा?
नाद करती का यावं लागतंय हॉटेल भाग्यश्री.. एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वांटिटी.. असा आवाज अन् रील सध्या सोशल मीडियावर नेहमीच ऐकायला मिळत आहे. या हॉटेलच्या मालकांचे नाव आहे नागेश मडके. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधील हे हॉटेल व्यवसायिक. आपल्या हटके स्टाईलमध्ये हॉटेलची जाहिरात करत त्यांनी सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळवली. दररोज हॉटेलची गर्दी, कापलेल्या बोकडांची संख्या सांगत ते आपल्या व्यवसायाची अपडेट देत असतात. त्यांची हीच हटके अन् खास स्टाईल नेटकऱ्यांना प्रचंड आवडली असून त्यांच्या रिल्सला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो.
बायकोच्या बड्डेला हत्ती घेतला..
दोन दिवसांपूर्वी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांनी बायकोच्या वाढदिवसानिमित्त टोयोटा कंपनीची महागडी नवी कोरी फॉर्च्यूनर खरेदी केली. ज्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या खास स्टाईलमध्ये शेअर केला होता. फॉर्च्युनरला 'हत्ती घेतला हत्ती' म्हणत त्यांनी पोस्ट केलेला या व्हिडिओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. सोशल मीडियावर रिल्स बनवणाऱ्या या अंगठाछाप बहाद्दराने एवढी महागडी गाडी दिल्याने नेटकरीही चकीत झाले. कायम आज हॉटेल बंद आहे असं सांगणाऱ्या व्यवसायिकाने अगदी काही महिन्यात एवढी महागडी गाडी कशी घेतली? असा सवाल नेटकरीही त्यांना विचारत आहेत.
मात्र जिद्द अन् चिकाटी हेच आपल्या यशाचे कारण असल्याचे हॉटेल भाग्यश्रीचे मालक सांगतात. माझ्या हॉटेल व्यवसायात पत्नीने साथ दिली. त्यामुळे मी यशस्वी झालो. म्हणूनच पत्नीला गाडी गिफ्ट दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच युवकांनी कोणत्याही वाईट मार्गाला न जाता व्यवसायाकडे वळा.. व्यसनाधीन होऊ नका, असं आवाहनही त्यांनी केले. थोडक्यात एका अंगठाछाप व्यक्तीच्या या उत्तुंग यशाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असून नेटकरीही त्यांच्या या यशाचे कौतुक करत आहेत.
RCB Captains : 18 वर्षात दिग्गजांना जमलं नाही ते पाटीदारने करुन दाखवलं; RCB चे आतापर्यंतचे 8 कर्णधार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world