अकोल्यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. पातुर तालुक्यातल्या चान्नी फाटाजवळील निर्गुणा नदीच्या पुलावरून दोन्ही वाहनं जात असताना हा अपघात झाला. नदीवरील पूल छोटा असल्यामुळे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कारवर उलटला. कार ट्रक खाली कार दबली गेल्यानं कारमधील प्रवासी वाहनात अडकले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसून कारमधील 4 जण जखमी झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, तांदळाच्या गोण्यांनी भरलेला ट्रक वाडेगावकडून पातुरकडे जात होता. दरम्यान अकोल्यातील चान्नी फाटाजवळील पुलावर ट्रक व चारचाकी वाहनाचा अपघात झाला. आज सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात कार चालक शेख अमीर शेख जाकीर हा गंभीर जखमी झाला आहे. तररशीद शहा जाफर शहा हा तरुण देखील जखमी झाला आहे. सर्व जखमींना नागरिकांनी तात्काळ वाडेगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल केले.
(नक्की वाचा- गोदान एक्स्प्रेसच्या डब्यातून अचानक निघू लागला धूर, प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या)
निर्गुणा नदीच्या पुलावरील झालेला अपघात एवढा भीषण होता की ट्रक जागेवरच उलटला. तर कार पुलावर लटकली होती. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला.
अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर घटनेची माहिती मिळतात वाडेगाव पोलीस चौकीतील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाती वाहनांना जेसीबीच्या मदतीने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.