Aaditya Thackeray emotional appeal rebel MPs: लोकसभेतील 6 खासदार फुटण्याच्या उंबरठ्यावर असताना, ठाकरे गटाकडून ही संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी आता थेट भावनिक कार्ड खेळण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन खूप मोठे असून, ज्यांना पक्षात परत यायचे असेल त्यांना ते नक्कीच माफ करतील, अशी अत्यंत भावनिक साद आदित्य ठाकरे यांनी बंडखोर खासदारांना घातली आहे.
पक्षातील एवढ्या मोठ्या फुटीची अधिकृत चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिल्यांदाच अशी मवाळ भूमिका समोर आली असली, तरी पक्षाच्या विरोधात जाणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही सोबतच देण्यात आला आहे.
बंडखोर खासदारांना नोटीस
ठाकरे गटाच्या लोकसभेतील खासदारांची एक महत्त्वाची बैठक काही दिवसांपूर्वी दिल्लीत झाली. मात्र या बैठकीला पक्षाचे 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे सर्व खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. पक्षाने या संभाव्य बंडखोरांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीमध्ये योग्य उत्तर न आल्यास थेट पक्षातून हकालपट्टीची कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
( नक्की वाचा : Sanjay Raut: संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'ला शिंदेच्या शिलेदाराचे आव्हान; सुरक्षेसाठी शिवसैनिक बनणार ढाल )
ओमराजे निंबाळकरांशी संपर्क नाही
बंडखोर खासदारांच्या गटात नाव असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना शनिवारी कोर्टाकडून एक मोठा धक्का बसला. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची कोर्टाने पुराव्यांभावी निर्दोष मुक्तता केली. या धक्कादायक निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी, 'मी माझी पुढील राजकीय भूमिका लवकरच जाहीर करेन' असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना विचारले असता, या संपूर्ण प्रकरणात ओमराजे यांच्याशी आपला सध्या कोणताही संपर्क झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगर फसणार? कोर्टाच्या निकालानंतर वाढलं शिंदेंचं टेन्शन, ओमराजे पुढे काय करणार? )
बंडखोर खासदार काय करणार?
दुसरीकडे, बंडखोर खासदारांच्या गोटातून वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटीस मिळालेले हे सर्व बंडखोर खासदार रविवारी संध्याकाळपर्यंत आपल्या बाजूचे सर्व पुरावे आणि उत्तरे पक्षाकडे सादर करणार आहेत. त्यानंतर येत्या 2 ते 3 दिवसांत हे सर्व खासदार एकत्र येऊन एक मोठी पत्रकार परिषद घेतील आणि आपली अंतिम अधिकृत भूमिका जाहीर करतील. त्यामुळे येत्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे.