मनोज सातवी
डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या समुद्र किनारी एक विचित्र बोट आढळून आली आहे. 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही बोट दिसून आली आहे. काही ग्रामस्थ समुद्र किनाऱ्यावर बसले होते. यावेळी आपल्याला रात्री साडे बाराच्या सुमारास ही बोट दिसल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. या बोटीवर दिवे होते आणि ते पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिक मच्छिमारांनी पोलिसांना आणखी एक माहिती दिलीय ज्यामुळे पोलीस अलर्ट झाले आहेत.
नक्की वाचा :क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईनं उचललं टोकाचं पाऊल
ही बोट, डहाणू भागात असलेल्या बोटींपेक्षा वेगळी आणि लांबी-रुंदीने जास्त असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे. या बोटीमुळे डहाणूवासीय टेन्शनमध्ये आले असून पोलिसांनी या बोटीचा शोध सुरू केला आहे. या बोटीतून लाईट दाखवण्यात आला होता. यावर ग्रामस्थांनी बोटीच्या दिशेने मोबाईल तसेच दुचाकीची लाईट दाखवला होता. हे लाईट बघताच बोट तिथू निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही स्पीड बोट असावी असा अंदाज घोलवड पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नक्की वाचा: वृद्ध व्यक्तींना तरुण बनवण्यासाठी इस्रायलचं 'टाईम मशिन'! बंटी आणि बबलीनं केली शेकडो लोकांची फसवणूक
डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावरील चिखले गावातील जिल्हा परिषदेच्या वडकती प्राथमिक शाळेच्या मागे असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर ही बोट दिसून आली. या बोटीचा समोरील टोक उंच होते आणि बोटीच्या मागच्या बाजूस एक मोठी केबिन असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाने सागरी व खाडी पोलीस ठाणे यांनी आपापल्या हद्दीमध्ये अलर्ट दिला आहे. पोलिसांनी पायी गस्त घालावी आणि बोटीबद्दलची माहिती जमा करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय मच्छीमार सोसायटयांनाही संशयित बोटीबद्दलची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्रात जाणा-या मच्छीमार बांधवाना काही संशयास्पद हालचाली दिसल्यास किंवा संबंधित वर्णनाची बोट दिसल्यास त्यांनी तातडीने पोलिसांना कळवावे अथवा नियंत्रण कक्षाला कळवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यापूर्वी घटना घडल्याने अधिक चिंता
शनिवारचा दिवस हा महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकासकामांचे उद्घाटने करण्यासाठी आणि नव्या विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहे. त्यांचे विविध कार्यक्रम असून यातील सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम हा मेट्रो-3 प्रकल्पाच्या लोकार्पणाचा असणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील आज कोल्हापुरात असणार आहेत हे दोन्ही नेते महाराष्ट्रात पोहोचले असून या दोघांच्या दौऱ्यापूर्वी डहाणूत हा प्रकार घडल्याने पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.