मनोज सातवी, प्रतिनिधी
Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरुच आहे. पालघर जिल्ह्याला गुरुवारी (15 मे) अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील पोचाडे गावात ढग फुटी सदृश्य अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने थैमान घातलं आहे. एक ते दीड तासाच्या पावसात पोचाडे गावातील 35 ते 40 घरांचे नुकसान झालं आहे. घरांसह गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा आणि अंगणवाडीचे देखील छप्पर उडविले. जवळपास संपूर्ण गावातील घरांची छपरे उडून गेली असून, अनेक कुटुंब बेघर झाली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घरात पाणी शिरल्याने धान्य साठा आणि सुक्या चार्याचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र गावातील नागरिकांसमोर आता संसार कसा करायचा? कुटुंब कसं चालवायचं ? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
विशेष म्हणजे हवामान विभागाने पालघरसह ठाणे मुंबईत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह (40-50 किमी प्रतितास वेग) पावसाचा इशारा दिला होता. तसेच जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड या तालुक्यात जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर विक्रमगड तालुक्यात दुपारी ढग फुटी सदृश्य पाऊस झाला आहे.
( नक्की वाचा : Rain Update : अवकाळी पावसाचा राज्यातील 21 जिल्ह्यांना फटका, प्राथमिक अहवालातून आली काळजीची बातमी )
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हजेरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच उष्मा वाढला होता. दुपारी 3 च्या सुमारास दोडामार्ग व कुडाळ तालुक्यात काही ठिकाणी हा पाऊस झाला. हवामान खात्याने पुढील दोन दिवसात तळकोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे त्या अंदाजानुसार आज जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यातील काही गावात हा अवकाळी पाऊस कोसळला. अर्धा तास कोसळलेल्या या पावसामुळे दोडामार्ग शहरातील रस्त्यांवर सकल भागात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.