लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक आणि दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापिका ॲड. वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रतिष्ठेचा युएन पॉप्युलेशन ॲवॉर्ड न्यूयॉर्क येथे प्रदान करण्यात आला. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांच्यानंतर हा मान मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत.
लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. देशभरात आणि जगभरात १७२ देशांतील कार्यकर्त्यांच्या कामगिरीचा सखोल आढावा घेऊन आठ ज्युरींच्या समितीने ॲड. देशपांडे यांची निवड केली. तब्बल ३३ वर्षांनंतर भारतात हा सन्मान परत आला आहे.
गर्भलिंग निदान व लिंगनिवडीविरोधात सातत्याने लढा देत त्यांनी महिलांचे संघटन उभे केले. अनेकदा स्टिंग ऑपरेशनद्वारे संबंधित डॉक्टरांवर कारवाईस भाग पाडले. राष्ट्रीय महिला आयोगावर पॅनेल ॲडव्होकेट, तसेच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणी व मूल्यमापन समितीच्या त्या सदस्य आहेत.
(नक्की वाचा : Pune News: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाटकाला पुण्यात विरोध, गोंधळ घालत बंद पाडला प्रयोग )
महिलांच्या हक्कांसाठी असलेल्या विविध कायद्यांमध्ये तज्ज्ञ म्हणून प्रशासनाला मार्गदर्शन करणे, खेड्यापाड्यांत महिलांचे संघटन करून दारूबंदी चळवळीला चालना देणे आणि साताऱ्यातील ‘मुक्तांगण' केंद्राच्या माध्यमातून कायदेविषयक सल्ला देण्याचे काम त्या गेली अनेक वर्षे करीत आहेत.
सातारकर व्यक्तीला मिळालेल्या या जागतिक प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.