Pandharpur News: ज्येष्ठ शिवचरित्र कथाकार अनिलकाका बडवे यांचे निधन; पंढरपुरासह राज्यभर शोककळा

अनिलकाका बडवे हे विख्यात शिवचरित्र कथाकार वसंत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज होते. आपल्या पूर्वजांचा शिवचरित्राचा आणि भक्तीचा वारसा त्यांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेला.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

पंढरपूरमधील प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत, सिद्धहस्त लेखक आणि वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व ह.भ.प. अनिलकाका बडवे यांचे आज निधन झाले. शिवचरित्र कथाकार संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज असलेल्या अनिलकाकांच्या जाण्याने वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. वारकरी संप्रदायातील एक मोठे नाव आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर होती.

प्रल्हाद महाराज बडवेंचा वारसा

अनिलकाका बडवे हे विख्यात शिवचरित्र कथाकार वसंत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज होते. आपल्या पूर्वजांचा शिवचरित्राचा आणि भक्तीचा वारसा त्यांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या वाणीतून साकारणारे शिवचरित्र ऐकण्यासाठी हजारो भाविक आणि शिवप्रेमी गर्दी करत असत.

प्रखर हिंदुत्ववादी आणि राजकीय प्रवास

अनिलकाका केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय होते. त्यांनी महाराष्ट्र हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. एक सिद्धहस्त लेखक म्हणून त्यांनी अनेक विषयांवर प्रबोधनात्मक लेखन केले आहे. प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करतानाच त्यांनी वारकरी संप्रदायातील मूल्यांची नेहमीच जपणूक केली.

आज दुपारी अंत्यसंस्कार

अनिलकाका बडवे यांच्या निधनाची बातमी समजताच पंढरपूरसह महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, आज दुपारी चंद्रभागेच्या तीरावर धार्मिक विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायाने एक मार्गदर्शक आणि प्रखर राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्व गमावले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article