प्रतिनिधी, निलेश बंगाले
विजेवरील वाढता ताण पाहता भविष्यात विजेला पर्याय शोधण्याची अतिरिक्त गरज आहे. अशा परिस्थिती विदर्भातील सर्वोत मोठा गोबरगॅस प्रकल्प हा आशेचा किरण ठरू शकतो. येथील गोबरगॅस प्रकल्पामुळे शेणापासून वीजनिर्मिती केली जाते. विशेष म्हणजे संत लहानुजी महाराज संस्थानातील अधिकतर विजेची गरज ही शेणापासून पूर्ण होते. जाणून घेऊया या गोबरगॅस प्रकल्पाविषयी...
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील संत लहानुजी महाराज संस्थान हे शासनाचे "ब" दर्जा प्राप्त असलेले संस्थान आहे. इथं संत लहानुजी महाराज वास्तव्याला होते, अशी आख्यायिका आहे. या संस्थानामध्ये विदर्भातील सर्वात मोठा गोबरगॅस प्रकल्प असून या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उत्पादन घेतले जाते. येथील गो-शाळेत एकूण 577 गाई असून या सर्व गाईंपासून रोज 3000 किलो शेण निघतं. या शेणाचा उपयोग गोबरगॅससाठी केला जातो. येथे चक्क 110 घनमीटरचा गोबरगॅस असून त्यातून दररोज 50 क्युबिक मीटर गॅसची निर्मिती केली जाते. हा गॅस जमा करण्यासाठी भल्या मोठ्या बलूनची व्यवस्था करण्यात आली आहे.
नक्की वाचा - ग्लोबल वॉर्मिंगमुळे देशाला उष्णतेच्या लाटेचा धोका; लोकसभा निवडणुकीवरही होणार परिणाम
येथील संस्थांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सकाळ-सायंकाळी मोफत जेवण असतं. या दोन्ही वेळेस साधारणतः 500 -600 भाविक भोजनाचा लाभ घेतात. इतक्या माणसांचा स्वयंपाक करण्यासाठी लागणारा गॅस संस्थान स्वतःच तयार करते. इथे गाईंच्या शेणापासून रोज 50 क्युबिक मीटर गॅसची निर्मिती केली जाते. यातील 12 क्युबिक मीटर गॅस हा रोजच्या जेवणासाठी वापरला जातो तर उर्वरित गॅसपासून वीजनिर्मिती केली जाते.
गोबरगॅसमधील गॅसचा वापर हा स्वयंपापाकसाठी वापरला जातो. यानंतर उरलेला गॅस 15KV इंजिनसाठी वापरण्यात येतो. विशेष म्हणजे येथील इंजिन गॅसवर चालतं व हे इंजिन सुरू झाल्यानंतर याच्यावर रोहित्र सुरू होऊन वीजनिर्मिती होते. ही वीज संस्थानच्या विविध कामासाठी वापरण्यात येते. यामध्ये 8 एकरातील संपूर्ण मंदिराच्या परिसराला लागणारे पाणी घेण्यासाठी 5 हॉसपॉवर च्या दोन मोटारी, चारा कापणारे यंत्र, भोजनालय परिसरातील सर्व यंत्रणा व इतर कामासाठी ही वीज वापरण्यात येते.
गोबरगॅससाठी वापरण्यात आलेले शेण काही प्रमाणात शिल्लक राहितं त्याला स्लरी असं म्हणतात. या स्लरीपासून कंपोस्ट खत तसेच गांडूळ खताची निर्मिती केली जाते. इथे वर्षाला 5 ते 7 टन गांडूळ खत तयार केलं जातं. त्याचबरोबर गाईंच्या गोमूत्रावर प्रयोग करून सुद्धा विविध उत्पादनं बनविली जातात. ज्यामध्ये गो अर्क, फिनाईल दशपर्णी अर्क, कीटकनाशके यांचा समावेश आहे. सोबतच गाईंच्या शेणापासून व मंदिरातील फुलांपासून सुगंधी धूप व धूप गौरी बनविली जाते.
या सर्वांपासून संस्थेला वर्षाकाठी काही रकमेची आवकसुद्धा होते आणि सोबतच मजुरांच्या हाताला कामही मिळतं. इथे असलेल्या गोशाळेतील गाईंच्या चाऱ्यासाठी 8 एकरात हिरवा गार चारा लावण्यात आला आहे आणि या गाईंच्या देखभालीसाठी एक स्वतंत्र डॉक्टरांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इथे असलेल्या 577 गाईंना लागणारा चारा कापण्याची मशीन ही संस्था तयार करत असलेल्या विजेवरच चालते.