समुद्राला ओहोटी अन् दोन डॉल्फिनचा जीव वाचवण्यासाठी धडपड; डहाणूचा धक्कादायक Video समोर    

डहाणूजवळील गुंगवाडा येथील समुद्रकिनाऱ्यावर दोन डॉल्फिन मासे खडकांमधील पाण्यात अडकून पडल्याने सुटकेसाठी धडपडत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
डहाणू:

डहाणूजवळील गुंगवाडा येथील समुद्रकिनाऱ्यावर दोन डॉल्फिन मासे खडकांमधील पाण्यात अडकून पडल्याने सुटकेसाठी धडपडत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आज सकाळी समुद्राला भरती आलेली असताना दोन्ही डॉल्फिन मासे समुद्रकिनाऱ्यावर आले होते. मात्र काही वेळाने समद्राला ओहोटी आली आणि समुद्राचे पाणी झपाट्याने कमी होऊ लागले. त्यामुळे खडकांमध्ये साचलेल्या पाण्यात दोन्ही मासे अडकून पडले. 

स्थानिक तरुणांनी या डॉल्फिनला पाण्यात जाण्यासाठी धडपड करत असल्याचं पाहिलं. त्यावेळी या तरुणांनी धडपडणाऱ्या दोन माशांचा व्हिडिओ काढून तो समाज माध्यमावर व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये काही तरुण डॉल्फिनच्या दिशेने दगड फेकताना दिसत आहेत. मात्र मासे समुद्रात जावेत यासाठी ते प्रयत् करीत होते, असे त्यांनी सांगितले.

काही वेळात वनविभागाला डॉल्फिन मासे अडकल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी समुद्रकिनारी गेले आणि माशांना कोणी इजा करणार नाही याची खबरदारी घेतली. त्यानंतर दुपारी पुन्हा समुद्राला भरती आल्यानंतर हे दोन्ही डॉल्फिन मासे पुन्हा खोल समुद्रात निघून गेले. डॉल्फिन मासे हे नर-मादी अशी जोडी असावी, ओहोटी आल्याने समुद्राचे पाणी ओसरल्यामुळे ते अडकले होते. मात्र पुन्हा भरती आल्यामुळे दोन्ही मासे सुखरूप खोल समुद्रात परत गेले आहेत, अशी माहिती वनविभागाच्या बोईसर वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कदम यांनी दिली. 

Advertisement

हे ही वाचा-5 मुलं... आई बापाचं टोकाचं पाऊल... निनावी पत्र अन् खेळ खल्लास

मे 2021 मध्ये पालघरच्या केळवे येथील समुद्रकिनारी असाच एक डॉल्फिन मासा खडकांमध्ये साचलेल्या पाण्यात अडकला होता. त्यावेळी येथील स्थानिक मच्छीमार राकेश मेहेर यांनी त्याला सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले होते. ऑगस्ट 2022 मध्ये पालघरमधील सातपाटी समुद्रात 7 ते 8 डॉल्फिन माशाचा मुक्त संचार पाहायला मिळाला होता. यापूर्वी डहाणू समुद्रकिनारी सुमारे 40 ते 45 फूट लांब 10 फूट रुंद मृत महाकाय व्हेल मासा आढळला होता. समुद्रातील प्रदूषणामुळे किंवा एखाद्या जहाजाची धडक लागल्यामुळे मासा मेला असावा असं सांगितलं जात होतं.