राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन केले आहे. महायुतीने विधानसभेत तब्बल २३० जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयानंतर आता मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.अशातच भाजपकडून राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची मोठी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 जागा जिंकत भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपकडेच असणार आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरु असतानाच दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये भाजप हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका खासगी कार्यक्रमासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. या कार्यक्रमानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रात्री भेट घेणार आहेत. या भेटीत राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव फायनल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत आजच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होतंय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नक्की वाचा: निवडणुकीत भोपळा, आता इंजिनही जाणार? राज ठाकरेंच्या मनसेचं काय चुकलं?
दुसरीकडे, निवडणुका पार पडल्यानंतर विधानभवनात विशेष अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. सरकार स्थापनेसाठी महायुतीला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. येत्या 2- 3 दिवसात यासंबंधीचे विशेष अधिवेशन पार पडेल. ज्याची तयारी सध्या सुरु झाली आहे.
दरम्यान, राज्यात सत्तेत आल्यानंतर आता भारतीय जनता पक्षासह, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. - नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंगला सुरवात झाली असून शिवसेना शिंदे गटाचे नेते, संजय शिरसाठ, भरत गोगावले, अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत.
या मंत्रीमंडळात नवीन चेहऱ्यांना जास्त स्थान मिळेल. काही मंत्र्यांनी थांबलं पाहिजे. तेच मंत्रिमंडळ रिपीट करायचे असेल तर त्याला काही अर्थ नाही. मंत्रिमंडळाची सायकल चेंज झाली पाहिजे. इतरांना देखील मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, संधी दिली पाहिजे, असे म्हणत संजय शिरसाट यांनी अप्रत्यक्षपणे मंत्रिपदाची मागणी केली आहे.
महत्वाची बातमी: वारसदार, अजितदादा! साहेबांचे 10 आमदारही फुटणार? 'त्या' बॅनरमुळे रंगल्या चर्चा