तळीराम मुख्याध्यापक, शाळेतच झिंग झिंग झिंगाट, गावकरी आले अन्...

संपुर्ण शाळेची जबाबदारीच ज्याच्यावर आहे तोच शाळेत बिनधास्त दारू पिताना आढळून आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
भंडारा:

जिल्हा परिषदेच्याच शाळेत शिक्षक मद्यपान करताना आढळून आला आहे. मात्र हा शिक्षक नुसता शिक्षक नाही तर तो त्या शाळेचा मुख्याध्यापकही आहे. संपुर्ण शाळेची जबाबदारीच ज्याच्यावर आहे तोच शाळेत बिनधास्त दारू पिताना आढळून आला आहे.  त्याला शाळेतच गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं आहे. वर्षभरापासून तो शाळेतच दारू पित होता असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. या मुख्यमाध्यापकाच्या विरोधात आता गावकरी आक्रमक झाले आहेत. आमच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचे सांगत त्यांनी त्या शिक्षकाला शाळाबंदी केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात बोंदरी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेचा मुख्याध्यापक रोज शाळेत दारू पिऊन येत होता. तशी तक्रार विद्यार्थ्यांनी पालकांना केली होती. हा प्रकार सतत होत होता. त्यानंतर गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि गावकऱ्यांनी त्या मुख्याध्यापकाला रंगेहात पकडण्याचं ठरवलं. त्यानुसार सापळा रचण्यात आला.

ट्रेंडिंग बातमी - सावरकर ते द्रोणाचार्य! संविधानावरील चर्चेतून राहुल गांधींकडून भाजपची कोंडी

सर्व गावकरी शाळेत घुसले. त्यावेळी तो मुख्याध्यापक शाळेतच मद्यपान करत असल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्यामुळे मुख्याध्यापक गांगरून गेला. त्याला शाळेतून बाहेर काढण्यात आले. संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर थेट याबाबतची तक्रार पंचायत समिती अधिकारी आणि केंद्र प्रमुखांना करण्यात आली. गंभीरबाब असल्याने या अधिकाऱ्यांनीही शाळेच्या दिशेने धाव घेतली. 

ट्रेंडिंग बातमी - इंदिरा गांधी संविधानविरोधी होत्या? श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना सवाल, लोकसभेत जोरदार गदारोळ

अधिकारी येईपर्यंत शिक्षकाला तिथेच थांबवून ठेवण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन यावेळी गावकऱ्यांना देण्यात आले. शिवाय शाळेला दुसरे शिक्षक दिले जातील असेही सांगितले. मात्र शाळेला दुसरा मुख्याध्यापक मिळत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही अशी भूमीका गावकऱ्यांनी घेतली. आक्रमक गावकऱ्या पुढे आता शिक्षणाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे असे गावकऱ्यांनी म्हटले आहे.  

Advertisement