Mumbai Goa Highway Video: पृथ्वी आहे की चंद्र? ड्रोन दृश्ये पाहिल्यावर पडलाय प्रश्न

Mumbai Goa Highway Condition: दुर्दैवाची बाब ही आहे की गणेशोत्सव जवळ आलेला असतानाही या मार्गाची कुठेही तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्याचे दिसत नाहीये.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2025) अगदी तोंडावर आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई,पुणे आणि राज्याच्या अनेक भागातून असंख्य माणसे कोकणातील आपल्या मूळ गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येत असतात.  मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील लोकांसाठी कोकण गाठायचे असेल तर मुंबई-गोवा महामार्ग हा मुख्य रस्ता आहे. मात्र तो इतका वाईट स्थितीत असतो की गणेशभक्तांना कोल्हापूरमार्गे तळकोकण गाठावं लागतं. मुंबई-गोवा महामार्ग गुळगुळीत आणि सुसाट करण्याच्या घोषणा अनेक झाल्या, हा महामार्ग नव्याने बांधण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असे सांगण्यात आले मात्र जी दृश्ये तुम्ही बघणार आहात ती पाहिल्यानंतर  हे दावे किती खरे आणि किती खोटे याचा निर्णय तुम्हीच करू शकाल. 

चिपळूणचा चंद्र

मुंबई -गोवा महामार्गावर वडखळ नाका ते महाडपर्यंतचा रस्ता, अरुंद, खड्ड्यांनी भरलेला आणि अनेक डायव्हर्जन करावी लागणारा आहे. चिपळूणमधली परिस्थिती गणेशोत्सवापूर्वी फारच बिकट झालीय. चिपळूणचा छायाचित्रकार असलेल्या चिराग मोरे याने चिपळूणमधला एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केला आहे. यामध्ये रस्ता कुठेच दिसत नसून फक्त खड्डेच दिसतायत. याच व्हिडीओमध्ये त्याने रस्त्यावरून वाहने जात असतानाचीही दृश्ये दाखवली आहे. यातून हे खड्डे किती मोठे आहेत आणि त्यातून जाताना वाहनचालकांना काय कसरत करावी लागतेय त्याचा सहज अंदाज येतो. 

15 लाख लोकांनी पाहिला व्हिडीओ

चिरागने काढलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 15 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याच्या या व्हिडीओवर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी या महामार्गाच्या दुर्देशेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवाची बाब ही आहे की गणेशोत्सव जवळ आलेला असतानाही या मार्गाची कुठेही तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्याचे दिसत नाहीये. त्यामुळे गणेशभक्तांना यंदाही हालअपेष्टा करत तासनतास गाडीतून पाठीचे कणे ढीले करत जावं लागणार हे निश्चित आहे.