प्रशांत जव्हेरी
चोरी करण्यासाठी चोर एक-एक नामी शक्कल शोधत असतात. अनेक ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे तर त्यांना चोरी करणं अडचणीचं होवून जातं. चोरी केली जाते पण सीसीटीव्ही मुळे काही तासातच ते पोलिसांच्या हाती लागतात. यावर तोडगा काही चोरांनी काढला आहे. त्याचा ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शहादा शहरातील दोंडाईचा रोडवरील भागात ही चोरी झाली आहे. त्यासाठी चोरांनी जी काही शक्कल लढवली आहे त्याचीच चर्चा सध्या शहरात रंगली आहे.
शहादा शहरातील दोंडाईचा रोडवर स्टेट बँक परिसरात 56 गाडे व्यापारी संकुल आहे. या संकूलात भुरट्या चोरांनी चोरीची भन्नाट आणि अजब शक्कल लढवली आहे. ओळख लपवण्यासाठी या चोराने स्वतःच्या कपड्यांचा वापर केला. त्यांनी आपले कपडे काढले. त्याच्य कपड्यांनी त्यांनी आपला चेहरा लपवला. सीसीटीव्हीत आपला चेहरा दिसू नये या उद्देशांनी त्यांनी ही आयडीया केली. आपला चेहरा दिसत नाही याची खात्री पटल्यानंतर या चोरांनी या संकुलातील एसी,कॉपर वायर आणि कॉम्प्रेसरवर डल्ला मारला.
चोरलेली ही महागडी वायर आणि साहित्य साठवण्यासाठी चोराने स्वतःच्याच पॅन्टचा पोत्यासारखा वापर केला. त्यानंतर एक एक करत सर्व चोरांनी तिथून पोबारा केला. हा संपूर्ण निर्वस्त्र चोरट्यांचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या या अजब चोराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या भुरट्या चोरांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडे या अजब चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पण त्यांचे चेहरे दिसत नसल्यामुळे पोलिसांसमोर त्यांना शोधण्याचे मोठे आवाहन असणार आहे.
या चोरांना शोधण्यासाठी परिसरातील आणखी काही सीसीटीव्ही तपासले जात आहे. चोरी केलेल्या ठिकाणी जरी त्यांनी स्वत:चे चेहरे लपवले असले तरी इतर ठिकाणी ते नक्कीच स्पष्ट पण दिसले असतील असं पोलिसांचं मत आहे. जवळपास हे चार चोर होते. त्यांनी प्रत्येकाने आपले कपडे काढले होते. ते उघडे झाले होते. पण याच कपड्यांच्या सहाय्याने त्यांनी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. आता या गँगचे नाव उघडी गँग म्हणून चर्चीली जात आहे. त्यांचाच शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.