मनोज सातवी, पालघर:
Vasai Virar News: विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरार पूर्व येथील मनवेलपाडा तलावात एका व्यक्तीने आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करत तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विरार पूर्व येथील मनवेलपाडा तलावात एका व्यक्तीने आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करत जीवन संपवल्याची घटना घडली आहे. अनंत काशीराम आग्रे (वय 56) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मनवेलपाडा येथील आश्रया हॉटेलच्या मागे असलेल्या वज्रेश्वरी अपार्टमेंट मध्ये राहत होते.
Police Robbery: पोलिसच निघाले लुटेरे! DSP सोबत छापा टाकायला गेले अन् 3 लाख चोरले, कुठे घडली ही घटना?
शनिवारी रात्री 8 वाजता च्या सुमारास त्यांनी तलावात उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवळपास दीड तास चाललेल्या शोधमोहीमेनंतर रात्री 9.30 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. अनंत आग्रे यांनी आत्महत्या का केली याबाबत विरार पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तलाव आणि उद्यान परिसरात सुरक्षा रक्षक नसल्याची गंभीर तक्रार केली असून अशा घटनांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पोलीस या आत्महत्येबाबत अधिक तपास करत आहेत.