निलेश बंगाळे, वर्धा: वर्ध्यामधून एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून बोगस बियाणांचा मोठा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू ,टाकळी झडसी येथे कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली. जप्त केलेल्या बोगस बियाणांची किंमत 50 लाखांच्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईनंतर अधिक तपास सध्या सुरु आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यामध्ये बोगस बियाणांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी (9मे) सेलू, झडशी टाकळी ,तालुका सेलू जिल्हा वर्धा येथे गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गोपाल सुरेशराव पारटकर राहणार झडशी टाकळी याच्या प्लॉटवर धाड टाकण्यात आली. यावेळी संशयास्पद एच टी बीटी कापूस बियाण्याचे एकूण 1466 पॉकेट व 1185 किलो खुले बियाणे त्याचप्रमाणे विक्रीसाठी करिता वापरत असलेली एक कार ,वजन काटा ,सिलिंग मशीन बियाणे पकडण्यात आले. ज्याची किंमत 50 लाखांच्या वर असून आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई अनुराग जैन जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा आणि शंकर तोटावार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वर्धा,यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई संजय बमनोटे ,कृषी विकास अधिकारी ,जिल्हा परिषद वर्धा, सुनील मुरारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शेलु, चंद्रकुमार माहुले तालुका कृषी अधिकारी शेलू, मनोज नागपूरकर कृषी अधिकारी पंचायत समिती वर्धा, बालाजी लालपालवाले पोलीस उपनिरीक्षक, राहुल विटेकर पोलीस उपनिरीक्षक वर्धा यांनी केली असून वर्धा जिल्हा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
नक्की वाचा - Pune News: तरुणीला आला पाकिस्तानचा पुळका, सोशल मीडियावर केली अशी पोस्ट की करावी लागली जेल वारी
महत्त्वाचं म्हणजे, गुजरात येथून ही बियाणे आणून येथे त्यावर पॅकेजिंग चा कारखाना थाटण्यात आला होता. येथून संपूर्ण विदर्भात बोगस बियाणे पाठवण्यात येत असल्याचा संशय आहे. बोगस बियाण्यांच्या किमती कमी ठेवण्यात येतात आणि डिस्काउंट असल्याचे भासविण्यात येते. त्यामुळे थोडे पैसे वाचविण्याच्या नादात शेतकरी या विकत घेतात. त्यांना पावती देखील मिळत नाही.
तसेच त्यांच्या पाकिटावर असली असल्यासारखी सर्व माहिती आणि चित्रे असल्याने विकत घेणाऱ्याला संशय येत नाही आणि मग जेव्हा त्याचे पिक नीट येत नाही, त्यामुळे मेहनत आणि सर्वच खर्च पाण्यात जातो. तेव्हा त्याला ते बोगस बियाणे असल्याचे कळते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पुढच्या वर्षाचा खर्च त्याला हाती पैसे नसल्याने भागवता येत नाही आणि यामुळे शेतकरी आणखी कर्जाच्या जाळ्यात अडकतो.