साजन धाबे
निवडणुकी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला जाईल असं आश्वासन दिलं होतं. पण राज्याची आर्थिक स्थिती पाहाता कर्जमाफी करणं शक्य नाही. तसं स्तुतोवाच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं. त्यामुळे कर्जमाफी होईल अशी आस असलेल्या शेतकऱ्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. त्यातूनच नैराश्यापोटी वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे अवयव विक्रीस काढले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सतिश इढोळे हा वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आहे. तो अडोळी गावात रोहातो. त्याची जेमतेम दोन एकर जमिन आहे. त्यांच्यावर चार लाखाचं पिक कर्ज आहे. त्याचे हाफ्तेही थकले आहेत. त्यामुळे व्याजही वाढलं आहे. त्यामुळे सतीश यांनी कर्जफेडीसाठी अत्यंत हृदयद्रावक निर्णय घेतला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कोणताही मार्ग उरले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःसह पत्नी आणि मुलांचे अवयव विक्रीसाठी काढले आहे. आज सकाळी वाशिमच्या मुख्य बाजारात अंगावर अवयवांचे दर लिहिलेले फलक लावून ते उभे होते. त्यात त्यांनी किडनी – 75000 रुपये, लिव्हर – 90,000 रुपये, डोळे – 25,000 रुपये' असे दर लावले होते.
त्यांनी अवयव विक्रीला काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर यांच्याकडे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने संपर्क साधलेला नाही. इढोळे यांच्याकडे फक्त दोन एकर शेती आहे. सततच्या नापिकीमुळे उत्पन्न तर सोडाच, पण लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यात कर्जाचा डोंगर वाढत असल्याने आता शेतीतून मार्ग निघणे अशक्य झाल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सरकारकडून कर्जमाफी शक्य नाही, शेतकऱ्यांनी कर्ज फेडावे' असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आमच्या पायाखालची जमीन सरकली आहे असं ते म्हणाले.
आम्ही कर्जमाफीच्या आशेवर होतो. पण आता सरकार काहीच करणार नाही हे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे असं ते म्हणाले. आमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत. सरकारने आमची किडनी, लिव्हर, डोळे विकत घ्यावेत, असे आवाहन इढोळे यांनी सरकारला केले आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कर्ज फेडू असं ही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे. शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि अशा टोकाच्या भूमिका घेण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.
अचानक शेतकरी कर्जमाफी वरून सरकारने युटर्न घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व गणितच बिघडले आहे.त्यात सतिश इढोळे यांनी अवयव विक्रीला काढल्याने त्याची एक वेगळीच चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूकी आधी सांगितलं सातबारा कोरा करू. पण निवडणुकी झाल्यानंतर सांगत आहेत आज 28 तारीख आहे. 31 तारखेपर्यंत पिक कर्ज भरा. पण आता तो कुठून भरणार. असं इढोळे सांगतात. शेत मालाला भाव नाही. अशा स्थितीत अवयव विकल्या शिवाय पर्याय नाही असं त्यांनी सांगितलं.