नागपूर: पाळीव कुत्र्यांना घराबाहेर फिरवताना त्यांच्या तोंडावर जाळी लावणे नागपूर पोलिसांनी बंधनकारक केले आहे. यासोबतच पाळीव कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यावर मालकाचे नाव आणि पत्ता लिहिणेही अनिवार्य करण्यात आले आहे. नागपूर शहरातील नागरिकांनी पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर फिरवण्यासंदर्भात नागपूर पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच, सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर श्वानांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी आदेश देताना सांगितले की, पाळीव कुत्र्याचा उपद्रव झाल्यास नागरिकांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. जाळीशिवाय एखादा पाळीव कुत्रा आढळल्यास त्याला मोकाट कुत्रा समजून कारवाई करण्यात येईल. काही कुत्र्यांचे मालक घराच्या दरवाज्याबाहेरच कुत्र्यांना सोडून देतात.
काही प्रकरणांत कुत्र्यांनी परिसरातील नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे पाळीव कुत्र्यांना बाहेर नेताना त्यांच्या तोंडाला विशिष्ट प्रकारची जाळी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. कुत्र्याला श्वास घेण्यास कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने ही जाळी लावावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या कारवाईस कोणी अडथळा आणल्यास किंवा कुत्र्यांना अनधिकृतपणे खाऊ घातल्यास लोकसेवकांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
पाळीव कुत्र्यानं सोसायटीमधील महिलेवर केला हल्ला, 10 फुट उंच कठड्यावरुन खाली कोसळली, पाहा Video
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टानेही काही महत्त्वाचे निर्देश दिले होते. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्याची परवानगी नाही. भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र खायला जागा बनवल्या जातील. तसेच भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांना २५००० ते २ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, असं कोर्टाने म्हटलं आहे.