राज्यात मान्सून दाखल झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर अनेक ठिकाणी नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. उद्या राज्यात पावसाची स्थिती कशी असेल याबाबचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील अनेक भागात उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोकणात अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- आषाढ वारीत सहभागी दिंड्याना 20 हजार रुपयांचे अनुदान, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा)
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
लातूर जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. जिह्यातील नदी नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. लातूर शहरातील बार्शी रोड, नांदेड रोड, अंबाजोगाई रोड भागात पावसाने चांगलाच जोर धरल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत.
(नक्की वाचा- 'हलाल सर्टिफिकेट'ला हिंदू संघटनांकडून उत्तर, प्रसाद शुद्धीसाठी मिळणार ओम प्रमाणपत्र)
वाशिममध्येही मुसळधार पावसाची हजेरी
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील गिंभा, मोहरी,जणूना परिसरात आज सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. गिंभा गावात पावसाचं पाणी शिरून अनेकांच्या घराचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घरात साठवून ठेवलेले बियाणे आणि खतेही भिजले. प्रशासनाने तत्काळ पावलं उचलच उपविभागीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर तहसीलदारही गावात पाहणी आणि मदतीसाठी दाखल झाले होते.