Banjara vs. Vanjari community : सध्या राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा-ओबीची मुद्दा सुरू असताना धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. हैद्रराबाद गॅझेटनुसार सरकारने बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीतून अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केलं आहे. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नसल्याचं मुंडे म्हणाले. विशेष म्हणजे बंजारा आणि वंजारी हे दोन्ही समाज एकच आहेत, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
त्यामुळे बंजारा आणि वंजारी समाज वेगवेगळा आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वंजारी आणि बंजारा एकच?
वंजारी आणि बंजारा यांच्यात नामसाधर्म्य असलं तरी दोन्ही जाती वेगळ्या आहेत. दोन्ही समाजाच्या भाषा, संस्कृती वेगवेगळ्या आहेत. दोन्ही समाजातली आडनावंही वेगळी आहेत. दोन्ही समाजात रितीरिवाज, मंदिरं, परंपरा वेगळ्या आहेत. दोन्ही समाज राजस्थानातून आलेल्या असल्या तरी दोन्ही जमातींमध्ये रोटी बेटीचा व्यवहार होताना दिसत नाही. बंजारा समाज विमुक्त जमातींमध्ये (VJNT)मध्ये येतो. वंजारी समाज भटक्या जमाती-ड (NT-D) मध्ये मोडतो. वंजारी समाज भगवान बाबांचे अनुयायी आहेत तर बंजारा समाज संत सेवालाल महाराजांची भक्ती करतो.
नक्की वाचा - Ratnagiri News: सकाळी मोर्चात, दुपारी मृत्यू; OBC नेत्याचं आंदोलनानंतर निधन, समाजावर शोककळा
बंजारा समाज कोण?
बंजारा समाज हा गोर बंजारा किंवा लमाण म्हणून ओळखला जातो. बंजारा समाज देशभरात विखुरलेला आहे. तांड्याने फिरून उदरनिर्वाह करणारा हा समाज आहे. बंजारा समाजाचा इतिहास सिंधू संस्कृतीपर्यंत जोडला गेलेला आहे. लाम्बडी ही बंजारा समाजाची मुख्य भाषा. काही राज्यांमध्ये बंजारा अनुसूचित जमातींमध्ये येतात. महाराष्ट्रात बंजारा विमुक्त जमातींमध्ये (VJNT) मध्ये येतात. हैदराबाद गॅझेटियरनुसार अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावं अशी मागणी केली जात आहे. हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी असा उल्लेख आहे. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली जात आहे. अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गाला 7% आरक्षण द्यावं अशी मागणी केली जात आहे.
वंजारी समाज कोण?
वंजारी समाजही एक व्यापारी समाज आहे. व्यापारीच नाही तर ही एक लढाऊ जमात मानली जायची. राजस्थानमधून दक्षिणकडे स्थलांतरित झालेल्या क्षत्रिय जाती जमातींपैकी ही एक जात आहे. महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती-ड (NT-D) या श्रेणीत मोडतात. वंजारी हे रेणुका आणि जमदग्नी ऋषींचे वंशज असल्याचं मानतात. वंजारा समाज स्वत:ला राजपूत कुळातल्या राणाप्रताप यांचे वंशज समजतो.