संजय तिवारी: अस्तित्वाचे संकट समोर उभे ठाकलेल्या माओवादी संघटनेला आता पुढे कोण नेतृत्व देणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरी माओवाद्यांचे जाळे, समर्थक फ्रंटल संघटना आणि माओवाद समर्थक काही कथित बुद्धिवादी तसेच छत्तीसगढ आणि महाराष्ट्र पोलिस तसेच भारतीय गुप्तचर संस्था यांचे ही याकडे लक्ष लागून आहे. माओवादी समर्थकांच्या वर्तुळात आणि त्यांच्या आपसी चर्चेत संघटनेचे अस्तित्व कसे टिकवायचे आणि नेतृत्व कोण करणार हे प्रश्न सर्वाधिक चर्चिला जात असल्याचे संकेत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या चहू बाजूंनी घेरलेल्या आणि अस्तित्वाचे गहन संकट उभे ठाकलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचे पोलित ब्यूरो सदस्य भूपती आणि देवजी या दोघांची नावे संघटनेच्या शीर्ष नेतृत्वासाठी सर्वाधिक संभाव्य नावे म्हणून घेतली जात आहेत. 69 वर्षीय मलोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती किंवा सोनू आणि 61 वर्षीय थिप्परी तिरुपती उर्फ देवजी यांची नावे घेतली जात असून होणाऱ्या घडामोडींकडे सुरक्षा एजन्सीज आणि गुप्तचरांचे बारीक लक्ष आहे.
कोण आहेत हे दोघे?
भूपती हा वरिष्ठ माओवादी नेता किशनजी याचा धाकटा भाऊ आहे. त्याला सशस्त्र कारवाया द्वारे प्रसार आणि विचारसरणीशी सुसंगत बौद्धिक प्रसार अशा दोन्ही क्षेत्रात अनुभव आहे. त्याची पत्नी तारक्का हिने अलीकडेच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसर्पण केले होते. काहींच्या मते ही रणनैतिक चाल असू शकते. भूपती आणि किशनजी ब्राह्मण कुटुंबातून येतात.
देवजी याच्याकडे दक्षिण बस्तर सह पक्षाच्या मिलिटरी कमांड ची जबाबदारी असून त्याला गुरिल्ला वॉर चा सर्वाधिक अनुभव असल्याची माहिती आहे. काही काळापूर्वी त्याची पत्नी सृजनक्का ही महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागढ परिसरात पोलिसांशी चकमकीत ठार झाली होती. अभेद्य समजले जाणारे अबूझ माड परिसर भेदल्या गेले आहे तर लगतच्या महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आता फक्त 20 ते 30 या दरम्यान जहाल माओवादी शिल्लक असावेत असे इंटेलिंजन्स एजन्सीज मधील सूत्रांचे म्हणणे आहे.
नक्की वाचा : MHADA Lottery : म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीतील घरांची किंमत झाली कमी! वाचा किती होणार तुमचा फायदा? )
पार्श्वभूमी :
भूपती पेडापल्ली येथील रहिवासी असून देवजी हा तेलंगणा राज्यातील आंबेडकर नगर येथील रहिवासी आहे. दोघेही 35 ते 40 वर्षांपासून सक्रिय असले तरी वयाची साठी पार केलेली असल्याने त्यांच्या भविष्यातील सक्रियते बद्दल शंका आहे. अशावेळी एखादे नवीन, मात्र अधिक तरुण पण अनुभवी असलेले नाव पुढे येऊ शकते, असा सुरक्षा एजन्सीज चा कयास आहे.
माओवादी संघटनेचा शीर्षस्थ म्होरक्या आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) चा जनरल सेक्रेटरी नंबाला केशव राव उर्फ बसव राजु हा 21 मे रोजी छत्तीसगड मधील माओवाद्यांचे अभेद्य गढ समजल्या जाणाऱ्या अबूझ माड भागातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाजवळ झालेल्या महत्त्वपूर्ण चकमकीत ठार झाला. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत देशातील माओवाद समूळ नष्ट करण्याचे विधान केले होते. त्यानुसार, जमिनीवर कारवाया सुरू होत्या. काही आठवडे सततच्या कारवाया नंतर करेगुट्टा डोंगरावरील माओवाद्यांचा तळ उध्वस्त करण्यात पोलिस आणि सुरक्षा बले यांना सामूहिक यश आले. माओवाद्यांच्या कथित रेड कॉरिडॉर मधील छत्तीसगढ, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा आणि झारखंड या राज्यांत सध्या माओवाद्यांच्या विरोधात पोलिस आणि सुरक्षा एजन्सीज ची सामूहिक ऍक्शन सुरू आहे.
अधिकांश नेत्यांचा खात्मा आणि अधिकाधिक कॅडर चा सफाया झाल्याने प्रथमच भारतातील माओवाद्यांपुढे अस्तित्वाचा गहन प्रश्न उभा झाला आहे. त्यामुळे, शहरी माओवाद्यांच्या जाळ्याकडे आणि फ्रंटल संघटना कडे एजन्सिज चे लक्ष लागून आहे.
(Badlapur News: बदलापूरकरांना मोठा दिलासा! पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार)