दरवर्षी 14 जानेवारी रोजी मकरसंक्रातीचा सण साजरा केला जातो. या दिवसांमध्ये पतंग उडविण्याची परंपरा आहे. आकाशात विविध रंगांच्या पतंग पाहताना आनंद होतो. मात्र याच पतंगांचा मांजा कोणाच्या गळ्याचा फास ठरतो. दरवर्षी मकरसंक्रांतीच्या काळात नायलॉन किंवा चायनीज मांजामुळे मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक नियमावली केली असतानाही याचा सर्रास वापर केला जातो. जाणून घेऊया हा नायलॉन मांजा नेमका इतका धोकादायक का आहे? भारतात या मांजाबाबत काय आहेत प्रतिबंध?
काय आहे नायलॉन मांजा?
पतंग उडविण्यासाठी अधिकतर नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. हा मांजा प्लास्टिक आणि धातूच्या मिश्रणापासून तयार केला जातो.
नायलॉन किंवा चायनीज मांजा सर्वसाधारण मांजाच्या तुलनेत धारदार असतो. या मांजातून करंट येण्याचा धोका असतो. हा मांजा सहजपणे तुटूही शकत नाही. याच कारणास्तव या मांजात अडकल्यानंतर अनेक पक्षी आणि माणसांचा मृत्यू झाला आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी हा मांजा नेपाळच्या मार्गाने भारतीय बाजारात आला होता. त्यावर प्रतिबंध लावण्यात आले, मात्र स्थानिक पातळीवर हे तयार केले जात आहेत.
चायनीज किंवा नायलॉन मांजा कसा होतो तयार?
या माजांमध्ये नायलॉन, मॅटेलिक पावडर, अॅल्युमिनियम ऑक्साइड आणि लेडचा समावेश असतो. यानंतर या मांजावर काच किंवा लोखंड्याच्या चुऱ्याने धार केली जाते. ज्यामुळेच हा मांजा अधिक घातक होतो. हा मांजा प्लास्टिकप्रमाणे दिसतो आणि ताणलाही जातो. मात्र हा मांजा खेचला तर तुटण्याऐवजी अधिक मोठा होतो. हा मांजा वापरून पतंग उडविताना यात एक कंपन तयार होतो.
नक्की वाचा - Nylon Manja : नायलॉन मांजामुळे विद्युत ताराही तुटल्या; अनेकांची रात्र अंधारात; वीज वितरण कंपनीचे अभियंते Shocked!
भारतात नायलॉन मांजावर बंदी...
नायलॉन मांजावर सरकारने बंदी घातली आहे. त्याची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 15 अंतर्गत 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार 6 महिन्यांपर्यंतची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा 1960, कलम 11 अंतर्गत 50 हजारांपर्यंत दंड किंवा 6 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या मांजाचा वापर करताना आढळल्यास तातडीने अटक केलं जाऊ शकतं.
दिल्लीत 2017 मध्ये नायलॉन मांजावर बंदी आणली. याशिवाय गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश यांसारख्या राज्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत नायलॉन मांजा विक्री-खरेदी आणि वापरावर बंदी आहे. दिल्ली उच्च न्यायालय आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या NGT ने वारंवार याबाबत सूचना दिल्या आहे. पतंग उडविताना केवळ कॉटन मांजाचा वापर करावा. मात्र तरीही लोक चायनीज मांजाची सर्रास विक्री करतात.
बंदी असतानाही विक्री कशी?
दिल्लीतील अनेक भागात मांजाची बेकायदेशीर विक्री सुरू आहे. विशेषत: मुख्य दिल्लीपासून लांब अशी अवैध ठिकाणे आहेत. चायनीज मांजाची मागणी जास्त आहे. हा मांजा 200 ते 1000 रुपयांना सहज विकला जातो. अनेक वेळा ग्राहक या मांजासाठी 300 रुपयांऐवजी 800 ते 1000 रुपये देण्यास तयार होतात.
नायलॉन मांजापासून कसा बचाव कराल?
- दुचाकीस्वारांनी हॅल्मेट वापरावे.
- गळ्याभोवती मफलर गुंडाळावी.
- नायलॉन मांजा लहान मुलांपासून दूर ठेवावा.
- पायी चालतानाही सावध राहावे आणि गळ्याभोवती मफलर गुंडाळावी.
- अधिकांश वेळा या माजांमुळे गळाच कापला जातो. त्यामुळे मान सुरक्षित राहील याकडे लक्ष द्यावं.
नायलॉन मांजामुळे मोठे अपघात
- 14 जानेवारी 2025 रोजी नाशिकमध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीचा नायलॉनच्या मांजाने गळा कापला गेला. यात त्याचा मृत्यू झाला.
- मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये नायलॉन मांजामुळे एका डॉक्टरचं नाक कापलं गेलं. त्यांच्या नाकावर 10 टाके पडले.
- गुजरातमध्ये नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने तीन ते चार जणांचा मृत्यू झाला.