आकाश सावंत, प्रतिनिधी
World's Smallest Buffalo : साताऱ्याची चिमुकली राधा सध्या बीडच्या परळीत सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. सामान्यपणे धिप्पाड शरीरयष्टीसाठी ओळखल्या जाणाऱ्या म्हशींच्या जगात राधाने आपल्या इवल्याशा रूपाने चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे. साताऱ्यातील ही अद्वितीय म्हैस सध्या परळी येथील महा पशुधन एक्सपोमध्ये दाखल झाली असून, तिला पाहण्यासाठी अक्षरशः जनसागर लोटला आहे. भारताच्या पशुधन वारशात ही एक अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानास्पद घटना मानली जात आहे.
परळीत रंगला महा पशुधन एक्सपो
तहसील कार्यालयासमोरील विस्तीर्ण मैदानावर भरलेल्या या एक्सपोमध्ये राज्यासह देशभरातील विविध दर्जेदार पशुधनाच्या जाती सहभागी झाल्या आहेत. मात्र, या सर्वांमध्ये भाव खाऊन जात आहे ती म्हणजे जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून ओळखली जाणारी राधा. या प्रदर्शनात येणारा प्रत्येक शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी आणि महिला आवर्जून राधाच्या स्टॉलला भेट देत आहेत. अनेक जण या चिमुकल्या विक्रमी म्हशीसोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र परळीत पाहायला मिळत आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांनो सुटका झाली, हिंजवडी मेट्रो धावली! 23 किलोमीटर प्रवासातील सर्व स्टेशन्स कोणती? पहा VIDEO )
जगातील सर्वात बुटकी म्हैस
मुरा जातीची ही राधा दिसायला अत्यंत देखणी आणि आटोपशीर आहे. तिची उंची अवघी 2 फूट 8 इंच असून तिचे वजन 290 किलो इतके आहे. सध्या तिचे वय 3 वर्षे 6 महिने आहे. तिच्या या वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक रचनेमुळेच तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या चिमुकल्या राधाला खरेदी करण्यासाठी सध्या तब्बल 75 लाख रुपयांची मागणी होत आहे, जे ऐकून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.
( नक्की वाचा : Rahul Narvekar: संतप्त शेतकऱ्यांसमोर राहुल नार्वेकरांनी पळ काढला; Video Viral! वाचा काय आहे प्रकरण? )
आहार आणि संगोपनाचे खास वैशिष्ट्य
राधाच्या आहाराबद्दल अनेकांना कुतूहल आहे, परंतु तिच्या मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला कोणताही वेगळा किंवा विशेष आहार दिला जात नाही. सर्वसाधारण म्हशींना जो चारा आणि खाद्य दिले जाते, तेच राधालाही दिले जाते. तिचे संगोपन अत्यंत प्रेमाने आणि काळजीपूर्वक करण्यात आले आहे. भविष्यात तिला वैद्यकीय सल्ल्यानुसार गाभण ठेवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या महा पशुधन एक्सपोच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट जातींच्या संवर्धनावर भर दिला जात आहे. गिनीज रेकॉर्डधारक राधाच्या उपस्थितीमुळे या प्रदर्शनाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली असून, भारतीय पशुधनाचे सामर्थ्य जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम या निमित्ताने झाले आहे. आयोजकांनी वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षेची चोख व्यवस्था केली असून नागरिकांना शिस्तीत दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.