मंगेश जोशी, जळगाव
सोशल मीडियावरच्या एका वादातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील यावल परिसरात घडली आहे. इंस्टाग्रामवर शिवीगाळ करणारा व्हिडिओ अपलोड केल्याच्या रागातून 19 वर्षीय तुषार तायडे या तरुणाला काही लोकांनी बेदम मारहाण केली होती, ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल बोरावल रस्त्यावर ही घटना घडली.
मारहाणीचे कारण काय?
तुषार तायडे याने इंस्टाग्रामवर (Instagram) शिवीगाळ करणारा एक व्हिडिओ अपलोड केला होता. याचा राग मनात धरून 7 ते 8 जणांनी त्याला अडवून बेदम मारहाण केली. मारहाणीत तुषार गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा-Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)
नातेवाईकांचे आंदोलन
तुषारच्या मृत्यूनंतर सतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. नातेवाईकांनी आरोपींना जोपर्यंत अटक होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या समोरच रास्ता रोको आंदोलन केले.
(नक्की वाचा- Pune News: हिंजवडीमधील नामांकित शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुलांसह शाळा प्रशासनाचे धावपळ)
पोलिसांची कारवाई
या संपूर्ण प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.